
Crime News : महिलेचा विश्वासघात करून अत्याचार करणाऱ्या दोषीला सात वर्षे कारावास
अमरावती : लग्नाचे आमिष दाखवून सतत पैसे व दागिने घेणे, त्यानंतर विश्वासघात व फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने (क्रं. सहा) आरोपीस सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
बुधवारी (ता. आठ) न्यायाधीश श्रीमती पी. एन. राव यांच्या न्यायालयाने हा निवाडा दिला. जयकुमार ऊर्फ जयंत नंदकुमार तायडे (वय ४०, रा. आश्रय कॉलनी, डाबकी रोड, अकोला), असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित युवतीच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी जयकुमार ऊर्फ जयंत तायडेविरुद्ध अत्याचारासह विश्वासघात केल्याप्रकरणी २६ डिसेंबर २०१२ रोजी गुन्हा दाखल केला होता.
सप्टेंबर २००८ ते १२ नोव्हेंबर २०१२ या कालावधीत जयकुमार ऊर्फ जयंत याने पीडित युवतीला (वय २४) वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून रोकड आणि सोन्याचे दागिने घेतले. विश्वासघात करून तिच्यावर अत्याचार केला. आपली फसवणूक झाल्याचे कळताच युवतीने फ्रेजरपुरा पोलिसांनी २०१२ मध्ये तक्रार केल्यानंतर त्यात गुन्हा दाखल झाला होता.
फ्रेजरपुराचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक सूर्यकांत राऊत यांनी याप्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता प्रशांत विजय देशमुख यांनी युक्तिवाद केला.
न्यायालयाने एकूण चार साक्षीदार तपासले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश श्रीमती पी. एन. राव यांच्या न्यायालयाने आरोपी जयकुमार ऊर्फ जयंत नंदकुमार तायडे याला अत्याचार व विश्वासघातप्रकरणी दोषी ठरवून सात वर्षे सश्रम कारावास आणि सहा हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त साधा कारावास आरोपीस भोगावा लागेल. याप्रकरणात पैरवी म्हणून सतीश हिवे व अरुण हटवार यांनी सहकार्य केले.