
धामणगाव : तालुक्यातल्या जुना धामणगाव येथील शेतमजूर महिला शहापूर-दाभाडा शेतशिवारालगत असलेल्या गारगोटी नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेली. तर दोन महिलांना नाल्यालगचा झुडपाचा आधार मिळाल्यामुळे त्या पाण्याबाहेर निघाल्या. ही घटना सोमवारी (ता. २९) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात आज जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे गारगोटी नाल्याला पूर आला. शेतातून घरी परत येत असताना नाला ओलांडून येण्याच्या प्रयत्नात तीन महिला वाहून गेल्याची माहिती आहे. यात संगीता मनदेव नागापुरे (वय ४०), सीमा वेळूकार, मंगला तायडे यांचा समावेश होता.
या तीनही महिला काम आटोपून घरी येत असतानाच अचानकपणे नाल्याला पूर आल्याने एकमेकींचे हात धरून निघत होत्या. दरम्यान, त्या पुरात वाहून गेल्या. यातील दोघींनी झुडपाचा आधार घेत पाण्याबाहेर येण्यात यश मिळविले, तर संगीता मनदेव नागापुरे या वाहून गेल्या.
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी महिलेचा शोध सुरू केला आहे. अमरावती येथील एनडीआरएफचे पथक महिलेचा शोध घेत आहे. दरम्यान, तहसीलदार वैशाख वाहूरवाघ, ठाणेदार सूरज तेलगोटे हे घटनास्थळी दाखल झाले होते.
शोध घेताना डीडीआरएफचे पथकप्रमुख जखमी
सचिन धरमकर, दीपक पाल, विशाल निमकर, देवानंद भुजाडे, भूषण वैद्य, गणेश जाधव, योगेश ठाकरे, राजेंद्र शहाकार, महेश मांडळे यांचे जिल्हा शोध बचाव पथक दाखल झाले होते. दरम्यान, शोध घेत असतानाच सचिन धरमकर हे जखमी झाले. त्यांना मंडळ अधिकारी देवीदास उगले, तलाठी गोपाल नागरीकर यांनी तत्काळ धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहेत.
तीन तरुण बुडाले
भंडारा : पवनी तालुक्यातील अत्री येथे तीन तरुणांचा बोडीत बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. २९) सायंकाळी घडली. संकेत रंगारी, साहिल रामटेके, प्रणय मेश्राम अशी मृतांची नावे आहेत. अत्री येथील १८ ते २० वर्षे वयोगटातील तीन मित्र सायंकाळी फोडीत पोहण्यास गेले. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने एक बुडत असताना त्याला वाचविण्याचा प्रयत्न करताना इतर दोन जणही बुडाल्याचे सांगितले जात आहे. गावकऱ्यांना बोडीजवळ कपडे व सायकल मिळाली. अड्याळ पोलिस व आपत्ती नियंत्रण पथकाने शोधमोहीम सुरू केली. रात्री साडेआठदरम्यान मृतदेह सापडले. अड्याळ पोलिस तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.