esakal | अमरावतीत लसींचा जुगाड, कमी मागणी असलेल्या केंद्रातून बोलाविल्या लसी

बोलून बातमी शोधा

corona vaccine
अमरावतीत लसींचा जुगाड, कमी मागणी असलेल्या केंद्रातून बोलाविल्या लसी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढतच चाललेला असून लसींच्या तुटवड्यावरून नागरिक संतप्त झाले आहेत. त्यामुळे आता लसींसाठी आरोग्य विभागाला जुगाड करावा लागतोय. कमी वापर तसेच कमी मागणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील लशी परत बोलावून त्या गर्दी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना पाठविण्यात येत आहेत.

हेही वाचा: रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ, दर आटोक्यात आणण्याची मागणी

जिल्ह्यातील लोणी, धामक, नांदगाव खंडेश्‍वर, पापळ यांसह इतर काही आरोग्य केंद्रांमधून लसी परत बोलविण्यात आल्याच्या मुद्यावर जिल्हापरिषदेतील सदस्य चांगलेच संतप्त झालेले आहे. मात्र, आरोग्य विभागाला हा लसींचा जुगाड करावा लागत असल्याची वास्तविकता आहे. वरील काही आरोग्य केंद्रांना कोट्यानुसार लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र, तेथे लसीकरण अतिशय संथ गतीने सुरू आहे. नागरिकांमध्ये लसीबाबत अद्याप तत्परता झालेली दिसून येत नाही, तर अनेक आरोग्य केंद्रांमध्ये लसींसाठी रांगा लागलेल्या दिसतात. हे विपरीत चित्र सध्या जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. अनेक आरोग्य केंद्रांवर नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. मात्र, काही ठिकाणी लसी असूनसुद्धा त्या उपयोगात येत नसल्याने आरोग्य विभागाने आता हा जुगाड सुरू केला आहे.

होय... लसी परत बोलविल्या - काही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसींना अतिशय कमी मागणी आहे. मात्र, जेथे लसींचा साठा आहे अशा आरोग्य केंद्रातून लसी परत बोलविल्या जात असून ज्या ठिकाणी नागरिकांची गर्दी होत आहे, असा आरोग्य केंद्रांना या पाठविण्यात येत आहेत. लशी संपल्यास राज्य शासनाकडून पुन्हा साठा पाठविला जातो. त्यामुळे काही आरोग्य केंद्रांतून लशी परत बोलविण्यात आल्यात.
- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी.