esakal | महापालिकेत सोमवार ठरला आंदोलनवार; कॉंग्रेसचे मेणबत्ती, तर सेना व मनसेचे निवेदन
sakal

बोलून बातमी शोधा

Amravati AMC

ऑगस्ट महिन्यातील अखेरच्या सप्ताहातील सोमवार महापालिकेसाठी आंदोलन वार ठरला. शहरातील विविध समस्यांवर कॉंग्रेससह मनसे, शिवसेना या राजकीय पक्षांनी आंदोलनाचे बिगूल फुंकले.

महापालिकेत सोमवार ठरला आंदोलनवार; कॉंग्रेसचे मेणबत्ती, तर सेना व मनसेचे निवेदन

sakal_logo
By
सुरेंद्र चापोरकर

अमरावती : ऑगस्ट महिन्यातील अखेरच्या सप्ताहातील सोमवार महापालिकेसाठी आंदोलन वार ठरला. शहरातील विविध समस्यांवर कॉंग्रेससह मनसे, शिवसेना या राजकीय पक्षांनी आंदोलनाचे बिगूल फुंकले. तर सामान्य नागरिकांनी आपल्या समस्या व मागण्यांचे निवेदन आयुक्तांना सादर करून न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. कॉंग्रेससह राजकीय पक्षांच्या आंदोलनाने सत्ताधाऱ्यांचा मात्र गणेशोत्सवात शिमगा झाला आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील विविध भागांतील पथदिवे बंद पडली आहेत. कंत्राटदारास पैसे न दिल्याने त्याने देखभाल दुरुस्तीचे काम बंद केल्याने शहरातील पथदिवे बंद आहेत, भर पावसाळ्यात ही स्थिती असताना त्यात गणेशोत्सवाची भर पडली. अशातच मोकाट पशू व श्‍वानांना उपद्रव वाढला असतानाही सत्ताधारी आणि प्रशासन गाढ झोपेतच आहेत, असा आरोप कॉंग्रेसने केला आहे. वारंवार पत्र दिल्यानंतरही प्रशासनाला जाग न आल्याने अखेर कॉंग्रेसने महापालिकेत मेणबत्ती आंदोलन करून प्रशासनासह सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, नगरसेवक प्रशांत डवरे, नीलिमा काळे, सलीम बेग, मंजूश्री महल्ले, शोभा शिंदे, वंदना कंगाले यांच्यासह कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या कक्षासमोर मेणबत्ती पेटवत सत्ताधारी व प्रशासनाचा निषेध केला. त्यानंतर आयुक्तांना रीतसर निवेदन देत मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला.

कॉंग्रेसच्या आंदोलनानंतर लगेच मनसे व शिवसैनिकांनीही आंदोलनाचा बिगुल फुंकला. प्रभागातील स्वच्छतेच्या मुद्द्यावर त्यांनी आयुक्तांना निवेदन देत इशारे दिले. ठिकठिकाणी कचरा साचला असून पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीचे रोग त्यामुळे बळावले असताना स्वच्छता विभाग मात्र कंत्राटदारांचे हित जोपासत दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. सेनेचे सुनील राऊत यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.

हॉटेल रंगोली पर्ल व महेश भवन येथे सुरू करण्यात येत असलेल्या खासगी कोविड रुग्णालयाच्या मुद्द्यावर नागरिक कृती समितीने आयुक्तांना निवेदन सादर केले. या रुग्णालयांना विरोध नसला तरी त्यांच्याकडून दुरुपयोग होऊ नये, अशी दक्षता घेण्याची मागणी कृती समितीने निवेदनातून केली. एकाच रस्त्यावर दोन रुग्णालये असल्याने विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यताही त्यांनी व्यक्त केली. मुन्ना राठोड व समीर जवंजाळ यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.

संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image
go to top