रमधाम आश्रमात आढळली दीड हजार वर्षे प्राचीन बुद्धमूर्ती

राहुल खोब्रागडे
सोमवार, 30 एप्रिल 2018

पवनारजवळील दत्तपुर येथे खोदकामात लाल रंगाच्या पाषाणात मानव आकार बनलेली ही मूर्ती मिळाली. या मुर्तीचे डोके व उजवा हात नष्ट झाला होता.

वर्धा - जिल्ह्यातील पवनार येथील आचार्य विनोबा भावे यांच्याद्वारे स्थापित येथील परमधाम आश्रम परीसरात स्थापन करण्यात आलेली प्रतीमा ही जिल्ह्यातीलच नव्हे तर संपुर्ण विदर्भात अप्रतिम मूर्ती असल्याची ख्याती आहे. सुमारे दीड हजार वर्षे पुरातन असलेली ही मूर्ती वाकाटक, गुप्त काळात तयार करण्यात आल्याची माहीती आहे.                          

पवनारजवळील दत्तपुर येथे खोदकामात लाल रंगाच्या पाषाणात मानव आकार बनलेली ही मूर्ती मिळाली. या मुर्तीचे डोके व उजवा हात नष्ट झाला होता. ही मूर्ती सडपातळ अंगकाठीची आहे यावर वस्त्रांच्या बारीक सरकुत्या असल्याचे अंकण पाहायला मिळते. ही प्रतीमा मानवी अंगकाठीच्या आकाराची असुन, तिचा उजवा हात अभय मुद्रेत असावा. उजव्या हाताने चिवराचे एक टोक धरलेले आहे. दुसरे टोक खाली लोंबकळत आहे. डाव्या हातावर महापुरुषाचे लक्षण असल्याचे चक्र कोरलेले आहे. खोदकामात मिळालेली ही मूर्ती परमधाम आश्रमात आणण्यात आली. येथे या मूर्तीला शिर बसविण्यात येऊन तीची स्थापना करण्यात आली. इसवीसन पाच ते सहाव्या शतकापर्यंत बौद्ध धर्म हा या क्षेत्रातील प्रमुख धर्म होता. तथागत गौतम बुद्धाच्या काळात नाग लोकांनी बौद्ध धम्माचा स्विकार केला.

नाग लोकांची वस्ती आजच्या भंडारा, वर्धा, चंद्रपूर, नागभिड, पवनी या भागात जास्त प्रमानात होती. हे ब्रिटीश इतिहासकार कनिंग हॉम यांनी मान्य केलेले आहे. तथागत गौतम बुद्धांच्या महापरिनीर्वाणानंतर त्यांच्या अस्थींचे जे आठ भाग करण्यात आले होते. त्यातील एक भाग पुर्व विदर्भात आणण्यात आला. त्याच अस्तीवर पवनी येथे स्तुप उभारण्यात आले. सम्राट अशोकाच्या काळात बौद्ध धम्माला खरी चालना मिळाली होती. मौर्यांची सत्ता पवनार आणि येथील परिसरात होती. पवनार येथील उत्खननात सापडलेल्या मद्यकुंभाच्या तुकड्यावरुन स्पष्ट झाले आहे. ज्या परिसरात ही मूर्ती सापडली, त्या परीसरात एकेकाळी मोठे विहार अस्तित्वात होते आणि कालांतराने ते नष्ट झाले, असा अंदाज आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Ancient Buddha statue found in the Ramadham Ashram