...आणि मुले बोलू लागली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

गरिबांची मुले असल्याने कॉक्‍लीअर इम्प्लान्टचा खर्च यांच्या आवाक्‍यात नव्हता. मात्र, शासनाची योजना धावून आली. मेयोत या सर्व मुलांवर शस्त्रक्रिया झाली. ही सारी मुले बोबडे बोल बोलू लागली. आणि त्यांनी आईवडिलांनी दिलेल्या हाकेला "ओ' दिला.

नागपूर : बाळ जन्माला आल्यानंतर काही दिवसात बोबडे बोल बोलू लागते. आणि सारे घर त्याच्या बोबड्या बोलांनी आनंदून जाते. मात्र काही पालकांच्या जीवनात हा आनंद कधी येतच नाही. कारण ती मुले जन्मत:च कर्णबधिर असतात. अशा मुलांच्या पालकांचे कान बाळाचे बोबडे बोल ऐकण्यासाठी कायम आसुसलेले राहतात. आता मात्र शासनाच्या एका योजनेमुळे अशी कर्णबधिर मुलेही बोलू लागली आहेत.
दोन ते पाच वर्षांखालील चिमुकली मुले. अनुश्री, अर्फा, प्रियांशी, सबिनी, बुध्यांश ही सारी देवाघरची फुले. परंतु, त्यांना ऐकू येत नव्हते. यामुळे ते बोलूही शकत नव्हते. आपल्या चिमुकल्या मुलांचे बोबडे बोल ऐकण्यासाठी पालकांचे कान आसुसले होते.

गरिबांची मुले असल्याने कॉक्‍लीअर इम्प्लान्टचा खर्च यांच्या आवाक्‍यात नव्हता. मात्र, शासनाची योजना धावून आली. मेयोत या सर्व मुलांवर शस्त्रक्रिया झाली. ही सारी मुले बोबडे बोल बोलू लागली. आणि त्यांनी आईवडिलांनी दिलेल्या हाकेला "ओ' दिला. मेयो रुग्णालयातील ही घटना. दोन दिवसांपूर्वी विदर्भातील पाच मुलांवर तर मागील दोन वर्षांत एडीआयपी योजनेंतर्गत 32 चिमुकल्यांवर कॉक्‍लीअर इम्प्लान्ट करण्यात आले. या सर्व शस्त्रक्रिया पद्मश्री डॉ. मिलिंद कीर्तने यांच्यासह मेयोतील कान-नाक-घसा विभागप्रमुख डॉ. जीवन वेदी, डॉ. विपीन ईखार, डॉ. शीतल दलाल, डॉ. रामतानी यांनी केल्या.

हे वाचाच - आमटे आठवडा म्हणजे काय, माहिती आहे काय?

या मुलांनी आईवडिलांचाच नव्हे तर बाह्यजगातील कोणताही आवाज जन्मानंतर ऐकला नाही. मात्र, मेयो रुग्णालयात मागील दोन वर्षांपासून त्यांच्यातील श्रवणदोष दूर करण्याची यंत्रणा उभारण्यात आली. ही मुले कॉक्‍लीअर इम्प्लान्टनंतर स्पीच थेरपीतून बोलू लागली. नुकतेच अनुश्री जांभुळे आणि अर्फा शेख, प्रियांशी निनावे, सबिना पासवान, बुध्यांश भिमटे यांच्यावर कॉक्‍लिअर इम्प्लान्ट करण्यात आले. कर्णदोष दूर करण्यासाठी पाच वर्षांच्या आतील मुलांमध्ये कॉल्कीअर इम्प्लान्ट करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा स्तुत्य उपक्रम मेयो रुग्णालयात दोन वर्षांपासून सुरू झाला आहे. कर्णबधिर चिमुकल्या मुलांसाठी हे केंद्र वरदान ठरले आहे. 32 मुलांमधील कर्णदोष दूर करण्यात मेयोला यश आले. मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संध्या मांजरेकर यांनी यावेळी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्‍टरांचे अभिनंदन केले.

कॉक्‍लीअर इम्प्लान्टमध्ये कानाच्या मागून मध्य कर्णामध्ये छिद्र केले जाते. अंतकर्णात हे यंत्र बसविले जाते. कानाच्या वरील भागात एक छोटे उपकरण बसविले जाते. एका वायरद्वारे वाचा केंद्रापर्यंत ध्वनी पोहोचविला जातो. शब्द आणि त्याची संरचना मुलाच्या मेंदूपर्यंत थेट पोहोचते. यातून शब्द समजण्यास व बोलण्यास मदत होते. इम्प्लान्टसाठी बाळाचा एक ते पाच वर्षांपर्यंतचा काळ सर्वोत्तम असतो. इम्प्लान्टनंतर तीन वर्षे स्पीच थेरपी आवश्‍यक असते.

बत्तीस मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया

कॉक्‍लीअर इम्प्लान्टसाठी सुमारे सात ते आठ लाखांचा खर्च येतो. हा खर्च गरिबांच्या आवाक्‍यातला नाही. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेतून मदत मिळाल्याने नागपूरसह विदर्भातील मोलमजुरी, खासगीत नोकरी करणाऱ्या पालकांच्या 32 मुलांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. कॉक्‍लीअर इम्प्लान्टनंतरच्या स्पिच थेरपीतून या मुलांना अक्षरांची ओळख झाली, ही सारी मुले बोलू लागली आहेत.
- डॉ. जीवन वेदी, विभागप्रमुख, कान-नाक-घसा विभाग, मेयो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ... and the kids started talking