अन्‌ शेतकरी- वाघ समोरासमोर; वाऱ्हा जंगलातील थरार

file photo
file photo

पांढरकवडा (जि. यवतमाळ) : टिपेश्‍वर अभयारण्यातील वाघाची दहशत अभयारण्याच्या परिसरात सर्वत्र पसरली आहे. असे असतानाच अगदी तीन फुटांवर असलेल्या वाघाच्या डरकाळीला प्रतिउत्तर म्हणून शेतकऱ्यानेही वाघासारखी डरकाळी काढून वाघाला पिटाळून लावल्याचा थरार गुरुवारी (ता.26) सकाळी 11 च्या सुमारास शेतशिवारात घडला. असे धाडस वाऱ्हा येथील शेतकऱ्याने केल्याने स्वत:सोबतच शेतात काम करणाऱ्या पुरुष व महिला मजुरांचेही प्राण वाचविले.
वाघाला पिटाळून लावणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव आहे पांडुरंग नारायण पोतले. टिपेश्‍वर अभयारण्यात जवळपास 25 वाघ असल्याचे सांगण्यात येते. या अभयारण्यातील वाघ टिपेश्‍वर अभयारण्याच्या परिसरातील वाऱ्हा कवठा, सुन्ना, वांजरी, ढोकी, अंधारवाडी, पाटणबोरी गावांतील शेतशिवारात अगदी मनमोकळेपणाने वावरत असतात. शेतामधील बैल, गाई, म्हशी या जनावरांचा फडशा पाडून तो आपले खाद्य शोधत फिरत असतो. अनेकदा वाघ माणसांवर हल्ला करून त्यांचाही जीव घेत असतो. त्यामुळे शेतशिवारात शेतीच्या कामाकरिता मजूर व शेतकरी जाण्यास धजावताना दिसत नाहीत.
गुरुवारी (ता.26) सकाळी 11 वाजता पांडुरंग पोतले मुलगा अमोल व पत्नी अरुणा यांच्यासोबत टिपेश्‍वर अभयारण्याच्या शेजारी असलेल्या शेतात कपाशीवर कीटकनाशकाची फवारणी करण्यासाठी गेले होते. मुलगा अमोल फवारणी करीत होता, तर पत्नी शेतामधील महिला मजुरांसोबत काम करीत होती. पांडुरंग पोतले कुंपणाचे तार कुठे तुटले तर नाही ना, म्हणून धुऱ्याकडे गेले. मात्र, तेथे जाताच अगदी चार फुटांवरच त्यांना वाघ दिसला. वाघाला पाहताच पांडुरंग पोतले यांची बोबडीच वळली. वाघाने पांडुरंग पोतले यांना पाहताच जोरदार डरकाळी फोडली. मात्र, जीवाची कोणतीही पर्वा न करता पांडुरंग यांनीही हिंमत न हारता वाघाला प्रतिउत्तर देण्याचे ठरविले आणि जिवाच्या आकांताने वाघासारखीच जोरदार डरकाळी फोडली. वाघाने दोन-तीन वेळा असा प्रकार केला, तर पांडुरंग यांनीदेखील तशीच डरकाळी फोडली अन्‌ चमत्कारच झाला. वाघाने तेथून पलायन केले आणि पांडुरंग पोतलेचा जीव वाचला. वाघ पळून जाताच पांडुरंगने शेतात असलेला मुलगा पत्नी व सर्व महिला मजुरांना बोलावून वाघ असल्याचे सांगितले. वाघाचे नाव घेताच सर्व मजूर धावत पळत आपापल्या घरी गेलेत.

वनविभागाकडून घटनास्थळाची पाहणी
पांडुरंग पोतले यांनी वाघाला पिटाळून लावल्याची बातमी शिवारात पसरली आणि ग्रामस्थ पांडुरंग पोतलेच्या शेतात जमा झाले. दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन वाघाचे पगमार्क घेतले. परंतु, वाघाच्या अशा दहशतीमुळे शेतशिवारात काम करायला कोणी हिंमत करीत नाहीत. त्यामुळे शेती कशी करावी, असा प्रश्‍न परिसरातील शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

बंदोबस्त न केल्यास निवडणुकीवर बहिष्कार
या भागातील जंगलात वाघाचा वावर असल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतातील कामे करण्यात अडचणी येत आहे. पिकांची निगा राखण्यासाठी शेती कशी करावी, असा प्रश्‍न उभा झाला आहे. म्हणून वनविभागाने याबाबत गांभीर्याने दखल घेऊन या वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा. न केल्यास येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com