रागाच्या भरात बापानेच केला मुलाचा खून

Angry father killed son
Angry father killed son

पांढरकवडा (जि. यवतमाळ) : मुलगा काहीच कामधंदा करत नाही म्हणून वडील त्याला सतत बोलायचे. यावरून बाप-लेकात वारंवार खटके उडायचे. बुधवारीही तेच झाले. कोणत्यातरी कारणावरून वडील मुलावर ओरडले. परंतु मुलाने न ऐकल्यासारखे करीत वडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. संतापलेल्या वडिलांनी रागाच्या भरात चक्‍क मुलावरच कुऱ्हाडीचे घाव घालून त्याला जागीच संपविल्याची घटना पांढरकवडा तालुक्‍यातील सुन्ना या गावात बुधवारी (ता. आठ) घडली. मंगेश रमेश मेश्राम (वय 26) असे मृताचे नाव असून, रमेश बाळू मेश्राम (वय 55) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील सुन्ना येथील रमेश बाळू मेश्राम यांचा शेतीचा व्यवसाय आहे. कुटुंबातील इतर सदस्य त्यांना शेतात मदत करीत होते. मात्र, त्यांच्या मंगेश नावाच्या मुलास दारूचे व्यसन जडल्याने तो कोणताही कामधंदा करीत नव्हता. त्यामुळे बाप-लेकांत नेहमीच खटके उडत होते. बुधवारी, 8 जुलैच्या रात्री घरातील सर्व जण एकत्रित बसलेले असताना रमेशने मंगेशला बोलावले. 'तू गावात रिकामटेकडा फिरत जाऊ नकोस. काहीतरी कामधंदा कर,' असे दरडावून सांगितले. त्यामुळे बाप-लेकात चांगलाच वाद झाला. मंगेशने काठीने बेदम मारहाण करून वडिलांस जखमी केले.

'तू कसलाही कामधंदा करत नाही अन्‌ म्हटले तर तू मलाच मारतो,' असे म्हणून वडिलांनी गायीच्या गोठ्यात ठेवलेली कुऱ्हाड काढून मंगेशच्या शरीरावर सपासप वार केले. मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून घाबरलेल्या वडिलांनी तेथून पळ काढला. मंगेशला जखमी अवस्थेत पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्‍टरांनी त्याला तत्काळ यवतमाळ येथे रेफर केले.

त्या ठिकाणी दाखल करताच अवघ्या काही वेळात मंगेशचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी वडील रमेश यास अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक भारत चपाईतकर करीत आहेत.

संपादन : अतुल मांगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com