आणखी एक माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 February 2020

वंचित बहुजन आघाडीतून राजीनामा देत बाहेर पडणारे माजी आमदार हरिदास भदे यांच्यासोबतच बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कारही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. हे दोन्ही माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असून, लवकरच त्यांच्या पक्ष प्रवेशाची शक्यता असल्याची माहिती आहे. 

अकोला : वंचित बहुजन आघाडीतून राजीनामा देत बाहेर पडणारे माजी आमदार हरिदास भदे यांच्यासोबतच बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कारही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. हे दोन्ही माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असून, लवकरच त्यांच्या पक्ष प्रवेशाची शक्यता असल्याची माहिती आहे. 
भारिप-बमसं आणि वंचित बहुजन आघाडीला विधानसभा व जिल्हा परिषद निवडणुकीनंतर मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्यातील दोन प्रमुख नेत्यांनी ‘वंचित’मधून बाहेर पडत राजीनामा दिला आहे. त्यात अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार झालेले माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांचा समावेश आहे. त्यांनी समर्थकांसह राजीनामा देत नवीन राजकीय डाव सुरू करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. आता हे दोन्ही माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहे. राष्ट्रवादीचे रामेश्‍वर पवळ यांच्या माध्यमातून या दोन्ही नेत्यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर मुंबईतील ‘वंचित’चे नेते राहुल डोंगरे यांनी राजीनामा दिल्‍यानंतर त्यांच्यासह या दोन्ही माजी आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली होती.  डोंगरे यांनी मुंबईत नुकताच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश घेतला आहे. आता लवकरच दोन्ही माजी आमदारही शरद पवार यांना भेटण्याची शक्यता असून, त्यानंतर त्यांच्या पक्ष प्रवेशाबाबत पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे. 

म्हणून दिला राजीनामा : सिरस्कार
ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्त्वातच मी राजकारणात आमदारपदापर्यंत पोहोचलो. त्यांचा आदेशानेच लोकसभा निवडणूक लढविली. विधानसभेत त्यांनी थांबण्याचा आदेश दिला तोही पाळला. जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान पहिल्याच बैठकीत 400-500 लोकांपुढे मला शिवीगाळ करण्यात आली. त्याबाबत मी बाळासाहेबांना लेखी व प्रत्यक्ष भेटून माहिती दिली होती. जेथे सन्मानच उरला नाही तेथे थांबणे शक्य नव्हते म्हणून राजीनामा दिला. अद्याप कोणताही राजकीय निर्णय घेतलेला नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट झाली. मात्र पक्ष प्रवेशाबाबत निर्णय झालेला नाही. समर्थकांसोबतच्या चर्चेनंतर पुढील पाऊल उचलू, असे माजी आमदार बळीरास सिरस्कार यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

राष्ट्रीवादीत ‘वेट ॲण्ड वॉच’
‘वंचित’मधून बाहेर पडलेले दोन माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. त्यांच्या पक्ष प्रवेशाबाबत स्थानिक स्तरावर राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भूमिकेत असून, अद्याप कोणतीही प्रतिक्रिया या पक्ष प्रवेशाबाबत उमटली नाही. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशाने अकोल्यात मंगळवारी झालेल्या महानगरच्या बैठकीतही विविध विषयांवर चर्चा झाली. मात्र त्यात दोन माजी आमदारांच्या पक्ष प्रवेशाचे पडसाद दिसून आले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another former MLA on the path of NCP