अकोल्यातील युवकाने केली ‘कोविड’वर मात!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 April 2020

शहरातील अकोट फैल परिसरताली 28 वर्षीय रुग्ण कोरोनाला (कोविड-19) हरवून सोमवारी (ता. 27) घरी परतला. त्यामुळे त्यास सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून घरी सोडण्यात आले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर्स व उपचारात सहभागी पथकाने उपस्थित रुग्णाला टाळ्या वाजवून निरोप दिला.

अकोला : शहरातील अकोट फैल परिसरताली 28 वर्षीय रुग्ण कोरोनाला (कोविड-19) हरवून सोमवारी (ता. 27) घरी परतला. त्यामुळे त्यास सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून घरी सोडण्यात आले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर्स व उपचारात सहभागी पथकाने उपस्थित रुग्णाला टाळ्या वाजवून निरोप दिला.

राज्यात सर्वत्र कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यात सुद्धा आतापर्यंत 16 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी पातूर येथील सात नागरिकांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना काही दिवसांपूर्वीच घरी सोडण्यात आले. दरम्यान सोमवारी (ता. 27) सुद्धा सर्वोपचारमधून एका कोरोनामुक्त झाल्याने एका युवकाला घरी सोडण्यात आले. संबंधित युवक संशयित कोरोनाबाधीत म्हणून 4 एप्रिल रोजी सर्वोपचारमध्ये दाखल झाला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याचेवर उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान 13, 19, 20, 23 व 24 एप्रिल रोजी त्याच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात समाधानकारक अहवाल आल्याने त्यास घरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोरोनामुक्त झालेल्या युवकाला टाळ्या वाजवून निरोप देते वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण,  प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर  घोरपडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्यामकुमार शिरसाम तसेच उपचार करणारे डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी उपस्थित होते. आता या रुग्णास 14 दिवसांसाठी घरातच अलगीकरणात व वैद्यकीय निरीक्षणात रहावे लागणार आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

सहा अहवाल निगेटिव्ह
जिल्ह्यातील सहा रुग्णांच्या तपासणीचे (स्वॅब) अहवाल सोमवारी (ता. 27) सकाळी प्राप्त झाले. त्यापैकी सर्वच अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती आहे. त्यामुळे सोमवारचा दिवस जिल्ह्यातील नागरिकांसाठी दिलासा देणारा राहिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: another patient recovers and goes home in akola