कर्तव्यावरील पोलिसाला तलाठ्याने केली मारहाण; तलाठ्याला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

beating to police

वाळू भरलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी ट्रॅक्टरवर बसून पोलिस ठाण्यात येत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला तलाठ्याने मारहाण केली.

कर्तव्यावरील पोलिसाला तलाठ्याने केली मारहाण; तलाठ्याला अटक

अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) - वाळू भरलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी ट्रॅक्टरवर बसून पोलिस ठाण्यात येत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला तलाठ्याने मारहाण केली. ही घटना बुधवारी (ता. ९) पहाटे तावशी टी पॉइंटवर घडली. अर्जुनी मोरगाव पोलिसांनी तलाठ्याला अटक केली.स्थानिक न्यायालयाने आरोपीला २२ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मांडोखाल-कोरंभीटोला येथे भांडण सुरू असल्याची बातमी पोलिसांना मिळाली. ठाणेदार सोमनाथ कदम, सहायक पोलिस निरीक्षक संभाजी तागड हे स्टाफसह तिथे पोहोचले. परत येत असताना त्यांना वाळूने भरलेला एक ट्रॅक्टर रस्त्यात उभा असल्याचे दिसून आले. पोलिसांनी चालकाला वाहन परवान्याची मागणी केली तेव्हा ट्रॅक्टर चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना नव्हता. ट्रॅक्टर पोलिस ठाण्यात जमा करण्यास सांगितले. या ट्रॅक्टरवर पोलिस नायक मोहन कुहीकर यांना बसविण्यात आले. त्यानंतर हा ट्रॅक्टर तावशी टी पॉइंटवर पोहोचला. या ठिकाणी अर्जुनी मोरगावचे तलाठी डाकराम हरिभाऊ पुस्तोडे यांनी ट्रॅक्टर अडविला.

ट्रॅक्टरवर बसलेल्या पोलिसाला एक व्यक्ती मारहाण करीत असल्याचा संदेश ठाणेदार सोमनाथ कदम यांना आला. लागलीच ते घटनास्थळाकडे रवाना झाले. त्यांनी मारहाण होत असलेल्या पोलिसाला सोडविले. पोलिसाला मारहाण करीत असलेल्या तलाठ्याला त्यांनी ठाण्यात आणले. पोलिस नायक मोहन कुहीकर यांनी तलाठी डाकराम हरिभाऊ पुस्तोडे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली. यावरून अर्जुनी मोरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सदर तलाठ्यावर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. तरी सुद्धा पोलिसांनी तलाठ्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी केला.