शेतातील मजूर करीत होता लाख विनवणी अन् अचानक निर्दयी दरोडेखोरांनी...

संजय भोसले
Monday, 31 August 2020

शनिवारी रात्री नागोराव शेतातील मजूर कुटुंबीयांसह जेवण करीत होते. त्यावेळी दरोडेखोर अचानक घरात शिरले. कुटुंबाला चाकूचा धाक दाखवीत लाथाबुक्‍क्‍याने मारहाण करून पैशाची मागणी केली. मदतीसाठी आलेल्या सालगड्याला दरोडेखोरांनी मारहाण करून बाजूच्या विहिरीमध्ये फेकून दिले.

ढाणकी (जि. यवतमाळ) : येथून जवळच असलेल्या खरूस शेतशिवारातील संजय जिल्हावार यांच्या शेतात शनिवारी (ता. २९) रात्री अंदाजे आठच्या सुमारास जवळपास दहा ते बारा दरोडेखोरांनी सालगडी नागोराव डहाके (वय २८) राहत असलेल्या झोपडीत शिरून त्याच्या कुटुंबीयांना मारहाण केली.

 

या कुटुंबांना वाचविण्यासाठी आलेल्या दुसऱ्या एका सालगड्याला मारहाण करून शेतातील विहिरीत फेकून दिले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

शनिवारी रात्री नागोराव शेतातील मजूर कुटुंबीयांसह जेवण करीत होते. त्यावेळी दरोडेखोर अचानक घरात शिरले. कुटुंबाला चाकूचा धाक दाखवीत लाथाबुक्‍क्‍याने मारहाण करून पैशाची मागणी केली. परंतु, मी मजूर व्यक्ती असल्याने कोणतीही रोख माझ्याजवळ नाही. जे काय आहे, ते सोने माझ्या पत्नीच्या अंगावरचे घेऊन जा, परंतु, मारहाण करू नका, अशी विनवणी नागोरावने केली.

दरोडेखोरांनी २० हजारांचा मुद्देमाल पळविला

यावेळी कुटुंबाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून बाजूच्या झोपडीतील दुसरा सालगडी धावत आला; तर त्याला दरोडेखोरांनी मारहाण करून बाजूच्या विहिरीमध्ये फेकून दिले. त्याच्या पत्नीच्या अंगावरील दागिने हिसकाविले. दोन मंगळसूत्र व कानातील रिंग, असा एकूण २० हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोर पळून गेले. या मारहाणीत दोन सालगडी व त्यांचे कुटुंबीय जखमी झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

अन् सालगड्याला विहिरीतून बाहेर काढले

जखमी अवस्थेमध्ये नागोराव डहाके याने पळत जात खरूस गाव गाठले. घडलेली घटना गावातील नागरिकांना सांगितली. खरूस गावातील नागरिकांनी शेतामध्ये धाव घेतली. यावेळी महिला व लहान मुले आरडाओरड करीत होती. नागरिकांना पाहताच त्यांच्या जिवात जीव आला व महिलांनी विहिरीत फेकून दिलेल्या आपल्या सहकाऱ्याला वाचविण्यासाठी मदतीची याचना केली.
दरोडेखोरांनी फेकून दिलेल्या सालगड्याला नागरिकांनी विहिरीतून बाहेर काढले.

असं घडलंच कसं :  कीटकनाशक खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यासोबत घडला असा प्रसंग की सोडली होती आशा, मात्र...

दरोडेखोरांना पकडण्यासाठी शोध मोहीम

या घटनेची माहिती पोलिसांना कळताच ठाणेदार विजय चव्हाण यांनी रात्रीच घटनास्थळ गाठत पाहणी केली. सर्वत्र दरोडेखोरांना पकडण्यासाठी शोध मोहीम राबविली जात आहे. परंतु, दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाले. ठाणेदार चव्हाण यांनी ढाणकी शहरामध्ये जुन्या बसस्थानक चौकातील सीसीटीव्ही कॅमेरांचीही पाहणी केली. परंतु, दरोडेखोर आढळून आले नाही. या घटनेमुळे शेतांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागोराव वामन डहाके यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास जिल्हा पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी उमरखेड यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार विजय चव्हाण करीत आहेत.
 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Armed attack on a farm laborer family