निवडणुकीसाठी 17 हजार कर्मचाऱ्यांची फौज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

यवतमाळ : जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकीसाठी तब्बल 17 हजार अधिकारी, पोलिस व कर्मचाऱ्यांची फौज राहणार आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघातून सुमारे 21 लाख 72 हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

यवतमाळ : जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकीसाठी तब्बल 17 हजार अधिकारी, पोलिस व कर्मचाऱ्यांची फौज राहणार आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघातून सुमारे 21 लाख 72 हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
विधानसभा निवडणुकीचा बिगूल कधीही वाजण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक विभागाने तयारी पूर्ण केलेली आहे. मतदान केंद्रापासून तर वाहतूक व्यवस्थेपर्यंतचे सर्वच नियोजन जिल्हा निवडणूक विभागाने केले आहे. यावेळी सात विधानसभा मतदारसंघांत 21 लाख 72 हजार 205 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी सहा पथकांची निर्मिती प्रशासन करणार आहे. त्यांच्या माध्यमातून निवडणूक कामावर आयोगाची नजर राहणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी 13 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे, तर कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी जवळपास पाच हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर असणार आहे. त्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचाही समावेश राहणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात दोन हजार 499 मतदान केंद्रे राहणार आहेत. यासाठी चार हजार 618 ईव्हीएम मशीन बोलविण्यात आलेल्या आहेत. तीन हजार 419 सीयू, तर तीन हजार 699 व्हीव्हीपॅट राहणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. याशिवाय केंद्राच्या अध्यक्षांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत 11 लाख 25 हजार 52 पुरुष व 10 लाख 47 हजार 122 महिला असे एकूण 21 लाख 72 हजार 205 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीनंतर विधानसभा मतदारसंघांच्या मुख्यालयी निवडणुकीची मतमोजणी केली जाणार आहे. त्याअनुषंगानेदेखील निवडणूक विभागाची तयारी सुरू आहे.

निवडणूक विभाग सज्ज
निवडणूक विभागाकडून आवश्‍यक ती सर्व तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांच्या यादीपासून ते आवश्‍यक असलेल्या सर्व बाबींचे नियोजनदेखील आटोपलेले आहे. निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागताच त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

मार्गदर्शन सूचनांची प्रतीक्षा
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या सूचनांची प्रतीक्षा संबंधित विभागाला लागली आहे. सध्या तरी एका उमेदवारांला 28 लाख रुपयांपर्यंतचा खर्च करण्याची मुभा देण्यात आलेली आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An army of 17 thousand personnel for the election