esakal | मुलांची मारेकरी आई गजाआड
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मुलांची मारेकरी आई गजाआड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सुलतानपूर पोलिसांच्या सूचनेवरून आरपीएफचे जवान व लोहमार्ग पोलिसांनी रेल्वतून जात असलेल्या महिलेला ताब्यात घेतले. मंगळवारी सुलतानपूर पोलिस नागपुरात पोहोचल्यानंतर हृदयाचा थरकाप उडविणारा घटनाक्रम उघडकीस आला. पोटच्या दोन मुलांची हत्या करून ती पळून जात होती.
अटक केलेली 26 वर्षीय महिला मध्य प्रदेशातील सुलतानपूरची रहिवासी आहे. तिला चार वर्षांची मुलगी आणि एक वर्षाचा मुलगा होता. चार दिवसांपासून ती मुलांसह बेपत्ता होती. पतीने तिचा शोधही घेतला. परंतु, उपयोग झाला नाही. पतीने सुलतानपूर ठाण्यात मिसिंगची तक्रार नोंदविली. दरम्यान, दोन्ही मुलांचे मृतदेह घराजवळील विहिरीत आढळले. प्रयत्न करूनही महिलेचा शोध लागला नाही. यावरून मुलांची हत्या करून आई पळून गेल्याचा निष्कर्ष काढत पोलिसांनी तिचा शोध सुरू केला.
तपासात मुलांची मारेकरी आई संपर्क क्रांती एक्‍स्प्रेसमधून पळून जात असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली. त्यांनी नागपूर रेल्वेस्थानकावरील कंट्रोल रूमला सूचना दिली. हिरव्या रंगाची साडी घालून असलेली 26 वर्षीय महिला संपर्क क्रांती एक्‍स्प्रेसने प्रवास करीत असून, तिला नागपुरात उतरवून घ्या, या सूचनेनुसार आरपीएफचे सहायक पोलिस उपनिरीक्षक एस. पी. सिंग यांच्या नेतृत्वात महेश गिरी, शिवराज पवार, शशिकांत गजभिये, तसेच लोहमार्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मुबारक शेख सहकाऱ्यांसह फलाट क्रमांक 2 वर पोहोचले. गाडी येताच पथकाने डब्यांचा ताबा घेतला. तपासणीत संशयित महिलेला ताब्यात घेतले. महिला असल्याने कायदेशीर प्रक्रियेनंतर तिला शासकीय वसतिगृहात पाठविण्यात आले.

loading image
go to top