तृष्णातृप्तीसाठी तहानलेल्या वन्यप्राण्यांची भटकंती; अवैध शिकाऱ्यांपासूनही धोका; कृत्रिम पाणवठ्यांकडे दुर्लक्ष 

artificial lakes in forest are filled with water for Wild Animals in forests
artificial lakes in forest are filled with water for Wild Animals in forests

कारंजा (जि. वर्धा ) : उन्हाळ्यात जंगलातील पाण्याचे स्रोत कमी होत असल्याने वन्यप्राणी गावाकडे धाव घेतात. या वन्यप्राण्यांचा ग्रामस्थांनाही त्रास सहन करावा लागून असून अनेक घटनाही घडल्या आहेत. दरवर्षी पाण्याअभावी अनेक वन्यप्राण्यांचा मृत्यूही होता. कारंजा वनपरिक्षेत्रात नैसर्गिक आणि कृत्रिम पाणवठे आहेत, पण उन्हाळ्याच्या दिवसांत ते अपुरे पडत असल्याने वन्यप्राण्यांना तृष्णातृप्तीसाठी भटकंती करावी लागते. याकडे वनविभागाने लक्ष देत उन्हाळ्याच्या दिवसांत पाणवठ्यांची देखभाल ठेवत त्यामध्ये पाण्याची सोय करावी, अशी वन्यप्रेमींची मागणी आहे.

तहानेने माणसाचा जीव व्याकूळ झाल्यानंतर तृष्णातृप्ती झाली की बरे वाटते. तसाच प्रकार वन्यप्राण्यांच्या बाबतही आहे. वन्यप्राण्यांना भूक व तहान लागल्यानंतर त्यांना जंगलक्षेत्रात अन्न व पाणी मिळाले नाही तर, तेही शेत शिवाराकडे किंवा गावाकडे आपला मोर्चा वळवितात. याचाच प्रत्यय गत काही दिवसांत तालुक्‍यात घडलेल्या घटनांतून दिसून आला आहे.

खैरवाडा, ब्राह्मणवाडा, हेटीकुंडी शेतशिवारात वाघिणी व बछड्याने अन्न व पाण्याच्या शोधात धाव घेतली. या वाघिणीचे व बछड्याचे अनेकांना दर्शन झाले. त्यामुळे परिसरातील गावांतील नागरिकांत अद्याप दहशत कायम आहे. कारंजा तालुक्‍यातील वनपरिक्षेत्र चार रेंजमध्ये विभागल्या गेले आहे. खरांगणा, तळेगाव, आर्वी व कारंजा अशी विभागणी केली आहे. तालुक्‍यातील हजारो हेक्‍टर शेती जंगलाला लागून आहे. त्यामुळे अनेकदा वन्यप्राण्यांकडून गुरांच्या शिकार केल्याच्या तसेच नागरिकावरही वन्यप्राण्यांनी हल्ले चढविले आहे.

यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच पारा वाढला आहे. या दिवसांत दरवर्षी जंगलातील वन्यप्राण्यांसाठी असलेले काही नैसर्गिक पाणवठे कोरडे पडतात. वन्यप्राण्यांना पाणी मिळत नसल्याने ते शेतशिवारात किंवा गावाकडे पाण्याच्या शोधात निघतात. या दिवसांत अवैध शिकाऱ्यांकडून त्यांची शिकार होण्याचा धोका संभवतो. तर या वन्यप्राण्यांचा मानवी जीवितासही धोका पोहोचू शकतो. ही बाब लक्षात घेत वनविभागाने उन्हाळ्याच्या दिवसांत वन्यप्राण्यांची भटकंती थांबविण्यासाठी व या प्राण्यांपासून जंगलव्याप्त गावातील नागरिकांना धोका होऊ नये, याकरिता जंगलात मुंबलक पाण्याची सोय उपलब्ध करणे गरजेचे आहे.

 सध्या कारंजा वनपरिक्षेत्रामध्ये 11 नैसर्गिक व 25 कृत्रिम पाणवठे आहे. पावसाळा पाणी भरपूर पडल्यास नैसर्गिक पाणवठ्यात पाणी राहते. अन्यथा ते कोरडे पडतात. यावर पर्यायी उपाय म्हणून वनविभागाने सिमेंट नाला बांध व बशीच्या आकाराचे कृत्रिम पाणवठे तयार केले आहे. यामध्ये बोअरवेल, सोलर पंपाने पाणीपुरवठा केला जातो. ज्या ठिकाणीही व्यवस्था नाही तिथे टॅंकरद्वारे आणि बैलबंडीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. अनेकदा काही कृत्रिम पाणवठ्यांकडे वनविभागाचे दुर्लक्ष होते. त्यात पाणीच नसते. वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावे लागते. वनविभागाने कृत्रिम पाणवठ्यांची संख्या वाढवून उन्हाळ्याच्या दिवसांत त्यामध्ये पाणी भरून ठेवावे, अशी वन्यप्रेमींची मागणी आहे.

उन्हाळ्यामध्ये पाण्याचे नैसर्गिक स्रोत कोरडे पडल्यास वन्यप्राण्यांची भटकंती होऊ नये, म्हणून वनपरिक्षेत्रात कृत्रिम पाणवठे तयार केले जातात. त्यामुळे पाणी उपलब्ध झाल्याने पाण्यासाठी होणारी, भटकंती थांबून मानव व वन्यजीव यांचा संघर्ष टाळण्यास मदत होते.
ए. एस. ताल्हन
वनपरिक्षेत्र अधिकारी 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com