कृत्रिम पाने घेणार श्‍वास

प्रशांत राॅय
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

नागपूर : वनस्पतींमध्येही भावना असतात असे भारतीय शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केले होते. त्यानंतर जीवशास्त्रात आपण शिकलो की वनस्पती श्‍वास घेतात. आता तर संशोधकांनी कृत्रिम पान बनविले. हे कृत्रिम पान हवेतील कार्बन डाय ऑक्‍साईड (कर्ब वायू) शोषून ऑक्‍सिजन (प्राणवायू) सोडण्यात सक्षम ठरले असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. यामुळे पर्यावरणास लाभ होणार असून वाढत्या प्रदूषणाचा सामना काही प्रमाणात करणे शक्‍य होणार आहे.
हवेतील कर्ब वायूचे शोषण करून प्राणवायू सोडणे हे वनस्पतींचे प्रमुख कार्य. वनस्पती नैसर्गिकपणे प्रदूषणास अटकाव करत असतात. मानवाच्या गरजांपोटी अनेक दशकांपासून मोठ्या प्रमाणावर वृक्षांची कत्तल होत आहे. परिणामी हवामान बदलांसह तापमान वाढ आणि प्रदूषणाचा राक्षक मानवासमोर ठोकून उभा आहे. यावर उपाय म्हणून संशोधकांनी वनस्पतीचे कृत्रिम पान विकसित करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यास यश आहे. विकसित केलेले हे पान एका विशिष्ट वातावरणात आणि दबावातच काम करीत होते. त्यामुळे त्यास मर्यादा होत्या. आता मात्र शिकागो येथील इलिनॉईस विद्यापीठाने सुधारित कृत्रिम पान (आर्टिफिशियल लीफ) विकसित करण्यात यश मिळविले आहे. संशोधकांच्या मतानुसार नैसर्गिक पानापेक्षा हे कृत्रिम पान दहापटीने जास्त परिणामकारक असून हवेतून मुक्तपणे कर्बवायू शोषणारे आहे. तसेच कर्ब वायूला प्राणवायूमध्येही बदलण्यासही मदत करणारे आहे. कृत्रिम पानाचे संपूर्ण युनिट नैसर्गिक पानाप्रमाणेच बाहेर कार्य करण्यास सक्षम आहे. हरितगृह वायूंमुळे (ग्रीनहाउस गॅसेस) होणारे मोठ्या प्रमाणावरील प्रदूषण यामुळे कमी होण्याचा विश्‍वास संशोधक व्यक्त करीत आहेत.
असे आहे कार्य व उपयोग
कृत्रिम पान कार्बन डायऑक्‍साईडचे कार्बन मोनोऑक्‍साईड आणि ऑक्‍सिजनमध्ये रूपांतर करते. येथून ऑक्‍सिजन हवेत सोडला जाऊ शकतो किंवा गोळा केला जाऊ शकतो तर हानिकारक वायू डिव्हाइसमधून खेचला जाऊ शकतो आणि मेथॅनॉलसारख्या कृत्रिम इंधन तयार करण्यासाठीही वापरला जाऊ शकतो. एखाद्या ठिकाणी 500 स्क्वेअर मीटरमध्ये ही कृत्रिम पाने ठेवल्यास एका दिवसात त्या भागातील कर्बवायूचे प्रमाण 10 टक्‍क्‍यांनी कमी होणे शक्‍य आहे. 1.7 मीटर बाय 0.2 मीटर व्यास असलेले 360 कृत्रिम पाने दिवसभरात अर्धा टन कार्बन मोनोक्‍साईड तयार करू शकतात.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: artificial leaves will breathe