esakal | चंद्रपुरात पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर "आशां'चा ठिय्या
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

चंद्रपुरात पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर "आशां'चा ठिय्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या आशा, गटप्रवर्तक महिलांनी मानधनवाढीच्या प्रश्‍नाला घेऊन आंदोलन तीव्र केले आहे. सध्या मुंबईत या कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. या उपोषणाच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता. 3) महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा वर्कर, गटप्रवर्तक संघटनेने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता. अकरा ते पाच वाजेपर्यंत हे आंदोलन चालले. त्यानंतर मोर्चेकरूंनी नियोजन भवनाकडे मोर्चा वळवून तेथे उपोषण सुरू केले.
आशा स्वयंसेवकांना कामावर आधारित मोबदला दोन हजार 500 रुपये मिळतो. गटप्रवर्तकांना आठ हजार 725 रुपये मानधन दिले जाते. हे मानधन अल्प आहे. गटप्रवर्तक, आशा स्वयंसेवकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, त्यांचे मानधन वाढवून द्यावे, अशी कृती समितीची मागणी आहे. या मागणीसाठी गेल्या काही वर्षांपासून कृती समितीचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र, त्याला फारसे यश आले नाही. 23 जानेवारी 2019 रोजी मंत्रालयात चर्चा झाली. त्यानंतर सहा फेब्रुवारीला आरोग्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी मानधन तीनपट करण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, त्यांचे आश्‍वासन हवेतच विरले. 14 जून 2019 रोजी शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री शिंदे आणि विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचीही बैठक पार पडली. त्यातही मानधन अडीच ते तीन पट करण्याचे आश्‍वासन देण्यात आले. आशांना सायकल, तर गटप्रवर्तकांना स्कुटीही देण्याचे मान्य करण्यात आले होते. 27 ऑगस्ट रोजी वित्तमंत्र्यांनी आपल्या दालनात सार्वजनिक आरोग्य मंत्री, कृती समितीचे नेते यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत वित्तमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आशा कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होण्याच्या दृष्टीने एक बैठक घेऊन प्रस्ताव कॅबिनेटला आणण्याच्या दृष्टीने कारवाई करावी, अशी विनंती केली होती. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मानधनवाढीवर तातडीने निर्णय घ्यावा या मागणीला घेऊन राज्यभरात बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. त्या पार्श्‍वभूमीवर चंद्रपुरात वित्तमंत्र्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडण्यात आला.

loading image
go to top