पंढरपूरला नव्हे तर येथे ओसंडून वाहिला भक्‍तांचा महापूर, वाचा काय ते...

Ashadi Ekadashi celebrates on social media
Ashadi Ekadashi celebrates on social media

पुसद (जि. यवतमाळ) :  "पंढरीचा वारकरी, वारी चुको नेही हरी' संत तुकाराम यांनी विठूमाउलीला "वारी चुकू नको देऊ', असे शेवटी एकच दान मागितले. खरेतर विठ्ठल भेटीची वारकऱ्यांची व्याकूळता हृदयाला पीळ पाडणारी आहे. कोरोनारूपी संकटाने यंदा पंढरीची वारी हरवली खरी. परंतु, आषाढी एकादशीला विठ्ठलभक्तांनी घर-मनाच्या मंदिरातच "जय हरी विठ्ठल'चा जयघोष केला. दुसरीकडे सोशल मीडियाच्या आभासी जगतात विठूभक्तीचा जणू महापूर ओसंडून वाहिला.

सोशल मीडियावरील "फेसबुक'च्या इंद्रायणी तीरावर बुधवारी (ता.1) आषाढी एकादशीला भक्तांचा मेळा माऊलीच्या ब्रह्मनादात आकंठ बुडून गेला. विठुरायाला आळविणाऱ्या भक्तिगीतांच्या ऑडिओ-व्हिडिओ, पांडुरंगाच्या रूपातील लहानग्यांचे सादरीकरण, विठूभक्तीने उचंबळून आलेल्या कलाकारांनी कलेतून सादर केलेली आगळीवेगळी भक्ती असे विठ्ठलभक्तीच्या नव्हाळीचे प्रकार अनुभवताना फेसबुकच्या "पोस्ट' मनाच्या संगणकात जणू साठवत गेल्या.

विठू माउलीवर प्रेम करणाऱ्या कवींनी आपल्या रचनांतून विठुरायाला पंढरीची वारी चुकल्याबद्दल मनातील हुरहूर व्यक्त केली.
"क्षमा करी हरी, चुकली पायी वारी, संकट आले भारी, कोरोना रूप.' पण काय करणार? तुझ्या भेटीविना एकादशीला कुठे मन लागत नाही, इंद्रायणीच्या वाळवंटात भक्तसागर लोटला नाही, या भावना व्यक्त झाल्या त्या अशा : पंढरी वैकुंठ, रिते वाळवंट, दाटला रे कंठ, पांडुरंगा..'

विठ्ठलवारीचे वृत्तांकन करणाऱ्या कलमगिरांनी "मिसिंग यू पांडुरंगा' अशी पोस्ट लिहीत पांडुरंगभक्तीचा कळवळा शब्दांच्या ओळी-ओळींतून जणू ओवीबद्ध केला. विठ्ठलाच्या भेटीला आसुसलेल्या वारकऱ्यांच्या मनाची अवस्था काहींनी अतिशय तरल शब्दांत पकडली. तर काहींनी वारीवरील आपले भाष्य हृदयाला भिडणाऱ्या शब्दांत मांडले. विठ्ठलभक्तीचा पाऊस नव्हे, तर अक्षरशः: महापूर सोशल मीडियावर पाहताना विठ्ठल नावाचे लोकमानसावर कसे गारुड आहे, याचा अनुभव "युझर'भक्त लोकांनी बुधवारी घेतला.

काहींनी स्वतः रेखाटलेल्या सुंदर, शैलीदार चित्रांतून विठुरायाला जिवंत केले. विठ्ठलरूपातील एका चिमुकल्याने "राजा पंढरीचा' ऐटीत सादर केला. पोलिसांचे विठ्ठलगीत व्हायरल झाले असताना "रुसलास का रे तुझ्या लेकरांवर' असा प्रश्‍न विचारत अस्मी व्यवहारे या बाल वारकऱ्याने विठुरायाला निरुत्तर केले. या चिमुकल्याच्या चेहऱ्यावरील भाव खरोखरच भक्तीने व्याकूळ झालेले होते. तर किरण केंद्रे यांच्या चिमुकलीने घरातील अतीव सुंदर विठ्ठलाच्या मूर्तीला प्रेमापोटी आलिंगन दिले. नवकवींची विठ्ठलभक्ती काव्यरसाने ओथंबून आली.

"तू काळ ...तूच माळ, तूच ऐल... तुच पार, तूच माझी साऊली.' अशा अनेक नवनिर्मितीच्या कळा विठुरायाच्या भक्तीने जन्माला घातल्या. या शब्दांना "लाईक'चे आशीर्वाद मिळताच फेसबुकचे "पोस्ट'करी धन्य झाले. शेवटी विठ्ठलवारी "मी'पणाचा अंत करते आणि एकोप्याने जगण्याची ऊर्जा देते, हेच खरे.


"गोकुळ परत नांदू दे'

"तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल' हा भीमसेनीस्वर ऐकताना खरेच का विठ्ठल विटेवर काही काळ थांबू शकेल? असा प्रश्‍न विचारत विठ्ठल घराघरांत, मनामनांत पोहोचला असल्याचे नेटकरी आपल्या पोस्टमधून लिहितो, तेव्हा विठ्ठलाचे अगणित लावण्य डोळ्यांत साठविल्याशिवाय राहत नाही. "विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा', हा अभंग सादर करताना शेवटी कोरोनाची महामारी दूर कर आणि भरले गोकूळ परत नांदू दे, अशी अपेक्षा नेटकरांनी पांडुरंगचरणी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com