Maharashtra vidhansabha 2019 : आशीष देशमुख म्हणाले, थोरात फक्त संगमनेरचे प्रदेशाध्यक्ष आहेत का?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

नागपूर : निवडणूक जाहीर झाली असतानाही प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आपल्या मतदारसंघाच्या बाहेर पडलेले नाही. ते फक्त संगमनेर मतदारसंघाचे प्रदेशाध्यक्ष आहेत का, असा सवाल करीत माजी आमदार आशीष देशमुख यांनी पक्ष नेतृत्वावरच थोफ डागली. त्यांनी शरद पवार यांचा आदर्श घेण्याचा सल्लाही कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांना दिला.

विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. सर्वच पक्ष व नेते रस्त्यावर उतरले असून, गावोगावी फिरत आहेत. मात्र, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात तसेच त्यांच्या दिमतीला पाच कार्याध्यक्ष असताना कोणीच राज्याच्या विचार करताना दिसत नाही. स्वतःचा मतदारसंघ आणि स्वतःची तिकीट यातच ते मश्‍गूल आहेत. याउलट निवडणूक जाहीर व्हायच्या आधीपासून शरद पवार या वयातही नेते व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आवश्‍यक तेथे स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन करीत आहेत. त्यांचे अनेक नेते सोडून गेले. तब्येतही साथ देत नाही. असे असताना जराही उसंत न घेता ते जातीने पक्षकार्यात लक्ष घालीत आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी जाहीर झाली आहे. किमान कॉंग्रेसच्या नेत्यांनी पवार यांच्याकडे बघून तरी कामाला लागावे असाही सल्ला देशमुख यांनी दिला.
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात तब्बल 15 वर्षांनंतर कॉंग्रेसने कमबॅक केले. महाराष्ट्रातील जनताही भाजपवर नाराज आहे. याविरोधात आता दोन्ही कॉंग्रेसने संघटित होऊन आवाज बुलंद कराण्याची गरज आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. महाराष्ट्रात पुन्हा आघाडीचे सरकार सत्तेवर येऊ शकते. आपण दिल्ली भेटीत शीर्षस्थ नेत्यांच्या कानावर हा प्रकार घातला आहे. ते निश्‍चितच काहीतर आदेश देतील अशी आशाही आशीष देशमुख यांनी व्यक्त केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashish Deshmukh said, is Thorat just the Sangamner's regional president?