केबल ऑपरेटर्सकडे पक्के बिल मागा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

नागपूर : ब्रॉडकास्टिंगचे नवीन नियम लागू केल्यानंतर केबल ऑपरेटर्सकडून दिल्या जाणाऱ्या फसव्या पॅकेजमुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड बसत असल्याच्या हजारो तक्रारी ट्रायकडे करण्यात आल्या. तक्रारींची दखल घेत, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणारे (ट्राय) केबल ऑपरेटर्सना पक्के बिल देणे बंधनकारक केले आहे. ग्राहकांनीही आपल्या ऑपरेटर्सकडे पक्के बिल देण्यासंदर्भात आग्रह धरावा असे आवाहन ट्रायने केले आहे.
ट्रायच्या सूचनेनुसार, केबल ऑपरेटर्सने यापुढे ग्राहकांना कोणत्याही परिस्थिती पक्के बिल देऊन त्या बिलामध्ये आकारण्यात आलेल्या शुल्काची वेगवेगळी माहिती द्यावी लागणार आहे. याशिवाय "एमएसओ' ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर ग्राहकांच्या बिल आकारणीचा मागील सहा महिन्यांपर्यंतचा डेटा ठेवणेही बंधनकारक करण्यात आले आहे. "ट्राय'ने ब्रॉडकास्टिंगसंदर्भात नवे धोरण लागू केल्यानंतर डिश टीव्ही आणि केबल कंपन्यांनी त्यांच्या व्यवस्थेमध्ये अनेक बदल केले. त्याचबरोबर आधी केबलसाठी जी दर आकारणी केली जात होती त्यातही बदल झाले. केबलच्या चॅनेल्सच्या शुल्कासह काही इतर शुल्काचाही त्यामध्ये समावेश झाला असल्याने संबंधित शुल्काची माहिती ग्राहकांना कळणे बंधनकारक असून ती माहिती केबल ऑपरेटर्सने बिलाद्वारे द्यावी, अशा सूचना सर्व केबल कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक लोकल केबल ऑपरेटरकडे "जीएसटी' रजिस्ट्रेशन आणि "जीएसटी नंबर' असणे अनिवार्य असून त्याशिवाय "जीएसटी' ची आकारणी करता येणार नाही. जीएसटी नंबर नसूनही केबल ऑपरेटर्स "जीएसटी'ची आकारणी करत असतील तर त्यांची तक्रार नोंदवावी, असे "ट्राय'कडून सांगण्यात आले आहे. सध्या केबल ऑपरेटर्सकडून साधे बिल दिले जाते. कोणत्या प्रकारची शुल्क आकारली आहेत, याची माहिती दिली जात नाही, अशा अनेक तक्रारी "ट्राय'कडे करण्यात आल्या होत्या. त्या तक्रारींना प्रतिसाद देऊन "ट्राय'ने सर्व केबल कंपन्या आणि ऑपरेटर्सना सक्त ताकीद देऊन पक्की बिले देण्याच्या सूचना केल्या आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ask for firm bills to cable operators