भाजपला विचारा सत्तेवर कशाला यायचे - आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

आमची सत्ता आल्यास पोलिस कर्मचाऱ्यांचे कामाचे आठ तास करणार, अंगणवाडीसेविकांच्या मानधनात वाढ करणार, ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण देत, शिष्यवृत्ती सुरू करणार आहोत. आमच्याकडे व्हिजन आहे. भाजप-सेनेला विचारा त्यांना सत्तेत कशाला यायचे आहे.

नागपूर - आमची सत्ता आल्यास पोलिस कर्मचाऱ्यांचे कामाचे आठ तास करणार, अंगणवाडीसेविकांच्या मानधनात वाढ करणार, ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण देत, शिष्यवृत्ती सुरू करणार आहोत. आमच्याकडे व्हिजन आहे. भाजप-सेनेला विचारा त्यांना सत्तेत कशाला यायचे आहे. त्यांच्याकडे व्हिजन नाही. यांनी मोठे घोटाळे केले आहे. त्यावर पडदा घालण्यासाठी सत्ता हवी आहे. हे लुटारूंचे सरकार असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. पुढील पाच वर्षांत काय करणार हे महारॅलीतून नागरिकांना सांगणार आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. संविधान चौकात रविवारी ‘नागपूर ते कोल्हापूर’अशा सत्ता संपादन रॅलीचा शुभारंभ त्यांनी केला. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते.

काँग्रेस व राष्ट्रवादीत कुटुंबशाही आहे. भाजप हे लुटारूंचे सरकार आहे. देशावर कर्जाचा डोंगर वाढतो आहे. मात्र, त्याचे त्यांना काहीही घेणेदेणे नाही. देशावर मंदी असताना सरकार काहीही उपाययोजना करीत नाही. मंदीच्या काळात नवीन ग्राहक निर्माण होणे आवश्‍यक आहे. तसे  कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही. यावरून सरकारला देशाच्या जनतेचे प्रश्‍न गंभीर वाटत नाही. त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची आवश्‍यकता आहे. यासाठीच पुढील पाच वर्षांत वंचित काय करणार यासाठी ही सत्ता संपादन रॅली काढण्यात येत आहे. सरकारने विरोधी पक्ष म्हणून हिणवू नये. आम्ही सत्तेसाठी निघालो आहे, याची दखल घ्यावी असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

विरोधात असताना भाजप-सेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारचे घोटाळे बाहेर काढले. आता सत्तेत असताना भाजप सेनेच्या सरकारने त्यापेक्षाही मोठे घोटाळे केले आहे. कॅगने आक्षेप नोंदवले आहे. ते समोर येत आहे. मात्र, विरोधी पक्ष यावर बोलण्यास तयार नाही. आम्ही हे सर्व समोर आणू, असे ते म्हणाले. यावेळी राजेंद्र महाडोळे, माजी आमदार हरीभाऊ भदे, युसूफभाई पिंजाणी, राजू लोखंडे, रवी शेंडे यांच्यासह मोठ्या संख्येत मान्यवर व कार्यकर्ते हजर होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ask Why the BJP to come to power says Prakash Ambedkar