"अटल'च्या प्रचारासाठी "अटल' 

सुरेश भुसारी
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

नागपूर - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नागपुरातील अनेकांशी अत्यंत सलोख्याचे संबंध होते. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी विरोधकही जात होते. अमोघ वक्तृत्वाची देणगी लाभलेल्या अटलजींची 2004 मध्ये झालेले भाषण नागपुरातील अखेरचे ठरले. विशेष म्हणजे "अटल'च्या प्रचारासाठी "अटल' असा प्रचार त्यावेळी झाला होता. 

नागपूर - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नागपुरातील अनेकांशी अत्यंत सलोख्याचे संबंध होते. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी विरोधकही जात होते. अमोघ वक्तृत्वाची देणगी लाभलेल्या अटलजींची 2004 मध्ये झालेले भाषण नागपुरातील अखेरचे ठरले. विशेष म्हणजे "अटल'च्या प्रचारासाठी "अटल' असा प्रचार त्यावेळी झाला होता. 

2004 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार अटलबहादूर सिंग होते. त्यांच्या प्रचारासाठी अटलजी नागपुरात आले होते. नागपुरातील ते त्यांचे अखेरचे भाषण होते. त्यानंतर ते नागपुरात येऊ शकले नाही, अशी माहिती आमदार अनिल सोले यांनी दिली. अटलबिहारी वाजपेयी यांचे भाषण ऐकणे हा एक समृद्ध अनुभव राहत होता. कस्तुरचंद पार्कवर त्यांचे अमोघ वक्तृत्व ऐकण्यासाठी लाखो लोक येत होते. यात त्यांचे विरोधकही राहत. नागपुरातील एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी म्हटले होते, "आप मेरा भाषण सुनने आते हो, लेकीन मत कॉंग्रेस को देते हो'. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे अटलजी अनेक वर्षांपासून नागपुरात येत होते. या काळात त्यांचे नागपुरातील अनेकांशी घरोब्याचे संबंध निर्माण झाले आहेत. यात बच्छराज व्यास, रजनी राय, नितीन गडकरी, स्व. सुमतीताई सुकळीकर यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. अटलजी जेव्हा जेव्हा नागपुरात येत त्यावेळी ते रामदासपेठ भागातील रजनी राय यांच्या घरी नियमितपणे जात. रजनी राय यांच्याशी त्यांचे कौटुंबिक संबंध होते. रजनी राय या 1998 ते 2002 या काळात अंदमान व निकोबारच्या नायब राज्यपालही होत्या. 

बच्छराज व्यास यांच्याशी त्यांचे जनसंघापासूनचे कौटुंबिक संबंध होते. बच्छराज व्यास हे नागपुरातील जनसंघाचे काम पाहत होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नागपुरात जाहीरसभा आयोजित करण्यात त्यांचा सहभाग राहत होता. भाजपचे सध्याचे आमदार गिरीश व्यास यांनीही या संबंधाच्या स्मृतींना उजाळा दिला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी अटलजींशी अत्यंत जवळचे संबंध राहिले आहेत. नागपूर व विदर्भाच्या दौऱ्यात प्रत्येकवेळी नितीन गडकरी त्यांच्यासोबत राहत असत. विद्यार्थी नेते असल्यापासून नितीन गडकरी हे अटलजींच्या संपर्कात आले होते. 

Web Title: Atal Bihari Vajpayee had very cordial relations with many in Nagpur