एटीएमचे तुकडे आढळले नाल्यात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

तालुक्‍यातील पाटणसावंगी पोलिस चौकी हद्दीतील पाटको स्पिनिंग गिरणीलगत असलेल्या इंडियन ओव्हरसीज बॅंकेच्या एटीएमची चोरी आणि कॅमेरे व रेकॉर्डरही पळून नेल्याची घटना गुरुवारी (ता.5) मध्यरात्रीनंतर पाटणसावंगी शिवारात घडली

सावनेर, (जि. नागपूर) : शनिवारी (ता.7) सकाळी 9 वाजताच्या सुमारास या चोरी प्रकरणातील एटीएमचे तुकडे कळमेश्वर तालुक्‍यातील गोंडखैरी रस्त्यावरील कळंबी गावाजवळील नाल्यात आढळल्याने चोरट्यांची टोळी लवकरच पोलिसांच्या हाती लागेल, या दिशेने पोलिस निरीक्षक अशोक कोहळी व पाटणसावंगी पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक निशांत फुलेकर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात प्रयत्नशील आहेत. 

 

तालुक्‍यातील पाटणसावंगी पोलिस चौकी हद्दीतील पाटको स्पिनिंग गिरणीलगत असलेल्या इंडियन ओव्हरसीज बॅंकेच्या एटीएमची चोरी आणि कॅमेरे व रेकॉर्डरही पळून नेल्याची घटना गुरुवारी (ता.5) मध्यरात्रीनंतर पाटणसावंगी शिवारात घडली. या घटनेची पाटणसावंगी परिसरात खळबळ उडाली होती. 

लॉकर, गेट व इतर सुटे भाग

चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास एटीएम चोरून नेले. या एटीएमचे तुकडे कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कळंबी शिवारातील नाल्यात आढळले. तुकडे, नोटा ठेवण्याच्या मशीनमधील बॉक्‍स, मशीनचे लॉकर, गेट व इतर सुटे भाग सावनेर पोलिसांनी जप्त केले. मात्र, त्यातील दोन लाख 83 हजार सहाशे रुपये चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

श्‍वानपथकालाही पाचारण

एटीएमचे तुकडे आढळून आल्याने चोरट्यांचा सुगावा लावण्यासाठी श्‍वानपथकालाही पाचारण केले होते. अद्याप चोरट्यांना अटक करण्यात आलेली नाही किंवा चौकशीसाठी ताब्यात घेतले नाही. मात्र, चोरट्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचा ठाम विश्वास घटनेतील तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक निशांत फुलेकर व्यक्त करीत आहेत. मागील काही दिवसापूर्वी काटोल येथून चोरट्यांनी एटीएमची चोरी केली होती. त्या एटीएमचे अशाच पद्धतीने केलेले तुकडे कळमेश्वर तालुक्‍यातील ब्राह्मणी नजीकच्या सोनपूर शिवारातील नाल्यात आढळून आले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ATM pieces found in drains