महिलेला लग्नाचे आमिष देत केला बळजबरी अत्याचार; नंतर केली ३२.५० लाखांनी फसवणूक

संतोष ताकपिरे
Saturday, 23 January 2021

महिलेचे बनावट आधार कार्ड आणि पॅनकार्ड सिघांत आणि त्याच्या मदतीला असलेल्या महिलेने तयार केले. सिघांत आपली फसवणूक करीत असल्याची बाब महिलेच्या लक्षात आली. महिलेने घटनेची कुठेही वाच्यता करू नये म्हणून बरेचदा मारहाण केली, असा आरोपी पीडित महिलेने राजापेठ ठाण्यात दाखल तक्रारीतून केला आहे.

अमरावती : एका महिलेला लग्नाचे आमिष देऊन तिच्यासोबत मैत्री करणाऱ्याने अत्याचार केला. यानंतर तिच्याकडून ३२ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज हडपून फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली आहे. सिघांत नामदेव अघाव (वय ४२, रा. अहमदनगर) व एक महिला असे आरोपींचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अघावविरुद्ध अत्याचार, मारहाण, फसवणूक व विश्‍वासघात केल्याच आरोप आहे. ३९ वर्षीय महिला नोकरी करते. असे पोलिस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांनी सांगितले. सिघांत अघाव याच्यासोबत महिलेची सोशल मीडियावरून ओळख झाली. दोघांमध्ये बरेच दिवस व्हॉट्सॲपवर चॅटिंग सुरू होती. त्यानंतर सिघांतने महिलेला एका धार्मिक स्थळी सोबत चालण्याची ऑफर दिली.

विदर्भातल्या ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा

महिलेला मध्यप्रदेशच्या बऱ्हाणपूर येथील एका ठिकाणी नेऊन लग्नाचे आमिष देत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर अनेकदा याच ओळखीचा फायदा घेऊन बऱ्याच ठिकाणी फिरायला नेले. विश्‍वास संपादन करून सिघांतने तिला अनेकदा व्यवसाय करण्यासह इतर महत्वाचे काम असल्याचे कारण सांगून तिच्याकडून २६ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम घेतली. तसेच महिलेकडील २० तोळे सहा लाख रुपयांचे सोनेही घेऊन फसवणूक केल्याचा आरोप आहे.

महिलेचे बनावट आधार कार्ड आणि पॅनकार्ड सिघांत आणि त्याच्या मदतीला असलेल्या महिलेने तयार केले. सिघांत आपली फसवणूक करीत असल्याची बाब महिलेच्या लक्षात आली. महिलेने घटनेची कुठेही वाच्यता करू नये म्हणून बरेचदा मारहाण केली, असा आरोपी पीडित महिलेने राजापेठ ठाण्यात दाखल तक्रारीतून केला आहे. संशयित आरोपीने दोघांमधील संभाषणाची व्हिडिओ क्‍लिप तयार केली होती. ही क्‍लिप व्हायरल करण्याची धमकी दिली गेली होती, असा आरोपही पीडितेने तक्रारीत केला आहे.

अधिक माहितीसाठी - 'मेडीकल'समोरील दृश्य पाहून डॉक्टरांचेही पाणावले डोळे, पण बघ्यांच्या भूमिकेशिवाय काहीच करू शकले नाही

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
प्रकरण महिला अत्याचाराशी संबंधित आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर याप्रकरणात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणी पोलिस सखोल चौकशी करीत आहेत. 
- किशोर सूर्यवंशी,
पोलिस निरीक्षक, राजापेठ ठाणे

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atrocities on Amravati woman amravati crime news