पती म्हणाला, माझ्याकडून मुलं होऊ शकत नाही; परपुरुषासोबत संबंध ठेव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पती म्हणाला, माझ्याकडून मुलं होऊ शकत नाही; परपुरुषासोबत संबंध ठेव

पती म्हणाला, माझ्याकडून मुलं होऊ शकत नाही; परपुरुषासोबत संबंध ठेव

अमरावती : पतीनेच परपुरुषासोबत संबंध ठेवण्यास बाध्य केल्याचा गंभीर आरोप पत्नीनेच केला. याप्रकरणी पोलिसांनी पीडितेचा पती आणि साथीदारांविरुद्ध अत्याचारासह ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. येवदा ठाण्याच्या हद्दीत एका गावात ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे लग्न २०१३ मध्ये झाले होते. गावातील एका व्यक्तीचे महिलेच्या घरी बऱ्याच वर्षांपासून येणेजाणे सुरू होते. सुरुवातील डिसेंबर २०२० मध्ये गावात राहणारा पतीच्या संपर्कातील व्यक्ती पतीसोबत घरी आला. पतीने घरी आलेल्या परपुरुषोसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी प्रथम पीडितेवर दबाव टाकला. पीडितेने परपुरुषोसोबत संबंधासाठी नकार दिल्यामुळे पतीने घटस्फोट देण्याची धमकी देऊन पती घराबाहेर पडला.

रात्री साडेदहाच्या सुमारास घरी आलेल्या परपुरुषाने पीडितेवर बळजबरीने अत्याचार केला. पतीच्या मित्राने पीडितेवर अशाच पद्धतीने पाच वेळा बळजबरीने अत्याचार केल्याचा आरोप विवाहितेने पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीत केला. पतीनेच त्याच्यापासून मुलबाळ होऊ शकत नाही असे सांगून पुन्हा परपुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बाध्य केल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे.

पतीचे वागणे आणि परपुरुषोसोबत संबंधासाठी बाध्य केल्यामुळे वैतागलेल्या पीडितेने अखेर पोलिसात पती आणि मित्राविरुद्ध तक्रार केली. येवदा पोलिसांनी पीडितेच्या पतीसह मित्राविरुद्ध अत्याचार, ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असता पोलिस कोठडी सुनावली.

पीडितेची तक्रार गंभीर स्वरुपाची आहे. गुन्हा दाखल होताच संशयित आरोपींच्या अटकेची कारवाई केली. या प्रकरणाचा तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
- अमोल बच्छाव, ठाणेदार, येवदा