सहकार नेते विजय उगले यांना पेटवून मारण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 सप्टेंबर 2019

धामणगावरेल्वे (अमरावती ) : जिल्ह्यातील सहकार नेते व आदर्श यशवंत ग्रामपंचायत झाडाचे शिल्पकार विजय उगले यांना पेट्रोल टाकून पेटवून मारण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना तालुक्‍यातील चिंचोली येथे शनिवारला (ता.31) घडली. प्रकरणी मंगरूळ दस्तगीर पोलिस ठाण्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

शनिवारला (ता.31) काही वैयक्तिक कामानिमित्त सहकार नेते विजय उगले व त्यांचा वाहनचालक सुनील ठाकरे हे चिंचोली येथे विलास जाधव यांच्या घरी भेटण्याकरिता गेले होते. दरम्यान विलास जाधव यांच्या घरासमोर गाडीमधून उतरताच संशयित आरोपी शेख शब्बीर शेख रहीम (रा. झाडा) हा त्याचा ऑटो घेऊन आला व श्री. उगले यांच्या समोर येऊन स्वतःजवळ असलेल्या दोन लिटरच्या प्लॅस्टिक बॉटलमधील पेट्रोल विजय उगले यांच्या अंगावर फेकले त्यामुळे उगले यांच्या डोक्‍यावर व तोंडावर पेट्रोल पडले. यात उगले यांचे कपडेसुद्धा पेट्रोलने ओले झाले.
त्यानंतर संशयित आरोपीने आगपेटीतील काड्या पेटवून उगले यांच्या अंगावर फेकून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे उगले मागे सरकले. त्यांनी आरडोओरड केल्याने त्यांचा वाहनचालक सुनील ठाकरे, बाजार समितीचे माजी सभापती विलास जाधव व अन्य काहीजण धावून आले. दरम्यान संशयित आरोपी तेथून तात्काळ निघून गेला. याप्रकरणी मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी विजय उगले यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास मंगरूळ दस्तगीर पोलिस करीत आहेत. घटनेबाबत ठाणेदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempts to fire Co-operative leader Vijay Ugale