रजतनगरीवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 November 2019

- खामगाव शहरात ३०० पोलिसांचा चोख बंदोबस्त
- संवेदनशील भागावार विशेष लक्ष
- ४८ ठिकाणी फिक्स पॉईंट
- २० विशेष पथकांची नेमणूक

खामगाव (जि.बुलडाणा) ः अनेक वर्षापासून सुरू असलेल्या रामजन्मभूमी आणि बाबरी मस्जिदच्या वादग्रस्त जागेचा निकाल आज (ता.९) सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खामगाव शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता संपूर्ण शहरात सुमारे ३०० पोलिसांचा चोख बंदोबस्त लावला गेला आहे. यामध्ये शहरात ४८ भागात फिक्स पॉईंट तैनात केले करण्यात आले आहेत, तर संवेदनशील भागात ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे.

अयोध्या येथील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे आज खामगाव शहरातील सर्वधर्मीय नागरिकांनी, विविध संघटनांनी स्वागत केले आहे. निकालामुळे कोणत्याही समाजाच्या भावना दुखविल्या जातील अशी एकही घटना शहरात घडली नाही. एकेकाळी अतिसंवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाच्या खामगाव शहराचा हा डाग नागरिकांनी पुसून काढला आहे. निकाल लागल्यानंतर शहरात नागरिकांनी कोणत्याच प्रकारचा जल्लोष न करता शांततेत निकालाचे स्वागत केले. नागरिकांच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, पोलिसांच्या विशेष पथकांकडून शहरात लक्ष ठेवण्यात येत आहे. 

याचबरोबर संपूर्ण शहरावर ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. गेल्या अनेक दशकांपासन सुरू असलेला रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाचा बाद आज सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील वादग्रस्त जागा हिंदु पक्षाच्या बाजूने देऊन राममंदिराचा मार्ग मोकळा केला आहे. यामुळे शहरातील नागरिक आज शहरात आपल्या घरी दिवे लावून दिपोत्सवाच्या माध्यमातून शांततेत या निकालाचे स्वागत करणार आहे, अशी माहिती पोलिस विभागाकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे एरव्ही लहान सहान गोष्टीवरून अफवा पसरविल्या जात असलेला सोशल मीडियावर आज एकही चुकीची आणि भडकावू पोस्ट दिसून आली नाही, पोलिसांनी याबाबत केलेल्या सूचना सोशल मीडियावर पाळण्यात आल्या आहेत. निकालानंतर शहरात शांतता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attention to keep drone camera at Khamgaon