esakal | मेयोतील आगीच्या घटनेचे "ऑडिट'
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

मेयोतील आगीच्या घटनेचे "ऑडिट'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) 31 ऑगस्टच्या मध्यरात्री पावणेतीन वाजता शॉर्टसर्किटमुळे आग लागली. परिचारिकेच्या सतर्कतेमुळे 9 नवजात शिशूंचा जीव वाचला. सुदैवाने कोणतीही जीवहानी झाली नाही. मात्र वारंवार होणाऱ्या शॉर्टसर्किटच्या आगीच्या घटनेचे ऑडिट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग, परिचारिका अधीक्षक विभागासह बालरोग विभागाकडून चौकशी करून हा अहवाल सादर करावा, अशाही सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
मेयो प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार मंगळवार (ता. 3) सार्वजनिक बांधकाम विभागासह बालरोग आणि मेट्रन यांनी येथील जळालेल्या अवस्थेतील अतिदक्षता विभागाची पाहणी केली. विद्युत यंत्रणा दुरुस्त कशी झाली, शॉर्टसर्किट कसे झाले, अशा विविध प्रश्‍नांवर विश्‍लेषणात्मक चौकशी करण्यात आली. सार्वजनिक विभागाच्या विद्युत यंत्रणेकडून वापर करताना काळजी घेण्यासंदर्भातील कच्चे दुवे शोधण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. यंत्रणेतील दोषांवरही चर्चा केली. येथील बालरोग विभागही चौकशीच्या रडारवर होता. डॉक्‍टरांच्या उपस्थितीवरूनही चिंता व्यक्त करण्यात आली. पाहणीदरम्यान येथे ऑक्‍सिजनचे मोठे सिलिंडर ठेवण्यात येत असल्याचे आढळले. ही जोखीम नको म्हणत लहान सिलिंडर या विभागात उपलब्ध करून देण्याची सूचना प्रशासनाने दिली आहे.

वैद्यकीय शिक्षण खात्याकडून दखल
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडून या गंभीर घटनेची दखल घेण्यात आली. मेयो प्रशासनाने या विभागाच्या सूचनेवरूनच चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पुढे आली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने अहवाल सादर करण्याची सूचना मेयो प्रशासनाला केली आहे. विद्युत यंत्रणेच्या ऑडिटची गरज पुढे येत आहे.

मेयोतील आगीच्या घटनेबाबत येथील परिचारिका अधीक्षक कार्यालय, बालरोग विभाग आणि सार्वजनिक विभागाकडे माहिती काढून अहवाल तयार करण्याची जबाबदारी दिली आहे. अतिदक्षता विभागातील विद्युत यंत्रणेची पारदर्शक चौकशी होईल. आगामी काळात अशी अनुचित घटना घडणार नाही, याची खबरदारी घ्यावी अशाही सूचना दिल्या आहेत.
- डॉ. अजय केवलिया, अधिष्ठाता, मेयो.

loading image
go to top