लेखिका डॉ. जुल्फी शेख म्हणाल्या, इतरांच्या वेदनांना शब्दात उतरविणारा खरा गझलकार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

नागपूर : स्वतःसह इतरांच्या दुःखांवर हळुवार फुंकर घालण्याची कला ज्याला उमगते. इतरांच्या वेदनांना शब्दात उतरविण्याची कला ज्याला अवगत असते तो खरा गझलकार असतो, असे प्रतिपादन साहित्यिक व लेखिका डॉ. जुल्फी शेख यांनी केले.

नागपूर : स्वतःसह इतरांच्या दुःखांवर हळुवार फुंकर घालण्याची कला ज्याला उमगते. इतरांच्या वेदनांना शब्दात उतरविण्याची कला ज्याला अवगत असते तो खरा गझलकार असतो, असे प्रतिपादन साहित्यिक व लेखिका डॉ. जुल्फी शेख यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र, नागपूरच्या वतीने सोमवारी श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात डॉ. सुलभा हेर्लेकर स्मृती पुरस्कार अमरावती जिल्ह्यातील नवोदित कवयित्री, लेखिका सीमा सलीमखॉं पठाण यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. जुल्फी शेख यांनी कविता, गझल याबाबत विचार व्यक्‍त केले. कवीचे हृदय कलंदरी असते. रसिकांचे हृदय पिळवटून निघावे असे काव्य कवींच्या हातून निर्मित झाले पाहिजे. कवितेतून निघणारे शब्द यज्ञही होतात आणि शस्त्रही होतात. त्यामुळे कवीने पारंपरिक जोखडांना तोडून काव्यनिर्मिती केली पाहिजे. कवितेला समजणेही तितकेच महत्त्वाचे असते. साहित्यिकाला रचनेशी संवाद साधता आला पाहिजे; तरच त्यांच्या हातून उत्तम साहित्य निर्मित होत असल्याचे डॉ. शेख यांनी सांगितले.
व्यासपीठावर डॉ. मोहम्मद असदुल्ला, प्रकाश कुलकर्णी, राजेश कुलकर्णी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी होते. प्रास्ताविक मोहम्मद सलीम यांनी केले. सर्वसाधारण कवी, गझलकार यांच्या प्रतिभेला प्रसिद्धी न मिळाल्याने सीमित राहते. परंतु, यशवंतराव प्रतिष्ठानने सीमा पठाण यांच्यासारख्या नवोदित कवींना पुरस्कार देऊन प्रोत्साहन दिल्याने प्रतिभासंपन्न लोकही प्रसिद्धीत येतील, असे डॉ. मोहम्मद असदुल्ला,यांनी सांगितले.
नवोदित कवींनी मातृभाषेत रचना करावी. त्यापूर्वी, त्यांनी भाषेचा अभ्यास करायला हवा, असे मत डॉ. मोहम्मद असदुल्ला यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. गिरीश गांधी यांनी डॉ. सुलभा हेर्लेकर यांच्या आठवणींना उजाळा देत नवोदित कवींनी देवाने दिलेले हुन्नर वाढवत प्रतिभा जगासमोर आणावी असे आवाहन केले. पुरस्कारप्राप्त सीमा सलीमखॉं पठाण यांनी आपल्या प्रतिभेला व्यासपीठ मिळवून दिल्याने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे आभार मानले. तसेच आगामी साहित्याबाबत माहिती दिली. संचालन रेखा घिये दंडिगे यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Author Dr. Zulfiya Sheikh said, a true gazalkar who put the pain of others into words