esakal | कर्जाची परतफेड केली तरीही पाठवला अटक वॉरंट, शेतकरी म्हणतो आता काय करू?
sakal

बोलून बातमी शोधा

money

कर्जाची परतफेड केली तरीही पाठवला अटक वॉरंट, शेतकरी म्हणतो आता काय करू?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

अमरावती : ऍक्‍सिस बॅंकेच्या कोलकाता मुख्यालयाने तेथील न्यायालयातर्फे अंजनगावसुर्जी तालुक्‍यात गावंडगाव येथील एका शेतकऱ्याला पकड वॉरंट पाठविला. कर्जाच्या वसुलीसाठी हा वॉरंट असून शेतकऱ्याने संपूर्ण कर्जाची सव्याज परतफेड केलेली आहे. वॉरंट रद्द करून आणा, असा तगादा पोलिसांनी लावल्याने शेतकऱ्याची कोंडी झाली आहे.

नितीन विठ्ठलराव गावंडे (रा. गावंडगाव बु., ता. अंजनगावसुर्जी) असे शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी 2016 मध्ये ऍक्‍सिस बॅंकेकडून कर्जावर मिनी ट्रॅक्‍टर घेतला होता. त्यांनी सलग दोन-तीन वर्षे बॅंकेची किस्त नियमित अदा करून कर्ज निरंक केले. अंजनगावसुर्जी ठाण्यातील पोलिस त्यांच्या घरापर्यंत नुकतेच जाऊन आले व त्यांची चौकशी करून आले. याबाबत त्यांनी ठाण्यात जाऊन प्रकरण काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तुमच्या नावे कोलकाता महानगर दंडाधिकारी (नं. 19) न्यायालयाचा अटक वॉरंट आहे. 27 मार्चपूर्वी तो वॉरंट न्यायालयातून रद्द करून आणा, अन्यथा अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी त्यांना बजावले

हे ऐकून ते गोंधळात पडले. हा बॅंकेच्या कर्जवसुलीचा वॉरंट असल्याचे समजताच त्यांनी ऍक्‍सिस बॅंकेचे शाखा कार्यालय गाठले, तेव्हा त्यांच्या नावे कुठलेच कर्ज शिल्लक नाही, उलट त्यांचेच 23 रुपये बॅंकेकडे निघतात, अशी माहिती त्यांना मिळाली. बॅंकेचे आम्हाला देणे-घेणे नाही. 27 तारखेपूर्वी अटक वॉरंट रद्द करून न आणल्यास अटक केली जाईल, असे पोलिस त्यांना म्हणत आहेत. कर्ज नियमित भरलेले असताना कोलकात्याला का जावे, असा सवाल श्री. गावंडे यांचा आहे. यासाठी त्यांनी शुक्रवारी (ता. सहा) जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली.

आपण आणि आपले कुटुंब अटक वॉरंटमुळे भयभीत झालेलो असून कर्ज भरूनसुद्धा अपराधी झाल्यासारखे वाटत आहे, शिवाय मानहानी होत आहे. याप्रकरणाची चौकशी करावी, असे साकडे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना घातले आहे.