बाबासाहेब म्हणाले होते, "शिका, मोठे व्हा...'

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीनंतरच खऱ्या अर्थाने माझे नव्हे तर आमचे आयुष्य आणि भविष्य उजळले. आमच्यासाठी सामाजिक कार्याच्या वाटा प्रकाशमान झाल्या. दीक्षाभूमीच्या नव्हे तर सात कोटी अस्पृश्‍यांचे महासूर्य असलेल्या डॉ. आंबेडकर यांनी आम्हाला त्यांच्या समोर उभे राहण्याची अन्‌ काही मिनिटांचा सहवास अनुभवण्याची संधी मिळाली. आजही "त्या' क्षणांच्या स्मृतींनी मन सुखावते, बाबासाहेब म्हणाले होते... शिका, मोठे व्हा... ते शब्द कानावर पडतात तेव्हा मन भरून येते....
हा अनुभव सांगताना 82 वर्षांचे दिगंबर अभिमन्यू बेले यांचे डोळे पाणावतात. मात्र भरभरून बोलून ते मन हलकं करतात. बाबासाहेबांनी दिलेल्या शिका या संदेशानुसार दिगंबर बेले तहसीलदार म्हणून निवृत्त झाले. त्या भेटीचे वर्णन करताना बाबासाहेबांनी आमची मित्रांची शिक्षणाबाबतची माहिती जाणून घेतली. "विद्यार्थी आहात ना...जा, अभ्यास करा...खूप वाचा...मोठे व्हा...' अशाप्रकारे बाबासाहेबांनी शिक्षण घेण्याचा आदेशच दिला. खुद्द बाबासाहेबांनीच शिक्षण घ्या असे बाळकडू घेण्याचा संदेश दिल्याने माझ्या मनाने उंच झेप घेण्याचे ध्येय ठरले. ती भेट 1954 सालची. भंडाऱ्याची निवडणूक होती. बाबासाहेब विमानतळावरून थेट सदर येथील माउंट हॉटेलमध्ये आले होते. त्यावेळचे मित्र रत्नाकर गणवीर, रामदास मेश्राम, रमेश निकोसे (जे आमदार होते) सारे जण युगांतर शाळेत नवव्या वर्गात शिकत होतो. बाबासाहेब आल्याची खबर लागताच "चला रे बाबासाहेबांना पाहून येऊ' असे म्हणत सारे जण माउंट हॉटेलच्या दिशेने निघालो. हॉटेजवळच्या कोपऱ्यात चिंचेचे झाड होते. त्या झाडाच्या सावलीत सारे बसलो. बराच वेळ प्रतीक्षा केली. बाबासाहेब दिसणार नाहीत, तोपर्यंत उठायचं नाही, हा संकल्प सोडलाच होता. काही वेळानंतर बाबासाहेब बाहेर आले. बाबासाहेबांचे ते पहिले दर्शन अतिशय विलोभनीय होते. मन भरून आले होते. उंचपुरा देह त्यांचा अजूनही डोळ्यात साठवला आहे. काठीचा आधार घेत ते बाहेर आले होते. बाजूलाच माईसाहेब होत्या. जवळ जाण्याची भीती वाटत होती, कारण शाळा मध्येच सोडून आलो होतो. त्यांच्या दिशेने आमच्या नजरा वळल्या आणि त्यांचा धीरगंभीर आवाज कानावर आला.
त्यांनी "काय रे...' असा सवाल केला. यानंतर "शिका...अभ्यास करा, मोठे व्हा...' त्यांनी बोललेला शब्द न्‌ शब्द अजूनही काळजावर कोरून ठेवला आहे. आयुष्याचं सोनं झालं, असे सांगताना बेले यांना अनावर झालं. डोळ्यातून अश्रूंच्या धारा थांबल्या नाहीत. डोळ्यांच्या कडा पुसत बेले म्हणाले, आजचे समाजाचे चित्र बघून बाबासाहेब रडले नसते, तर साऱ्यांना मारले असते.

श्‍वास असेपर्यंत बाबासाहेब हृदयात
आईवडिलांसह चार भावांसह मी स्वतः दीक्षाभूमीवर बाबासाहेबांच्या त्या दीक्षा सोहळ्याचा साक्षीदार आहे. बाबासाहेबांचा तो धम्मदीक्षा सोहळा नजरेत साठवून ठेवला आहे. त्यांच्या हस्ते दीक्षित झाल्यानेच आयुष्य उजळून निघाले. दिगांबर बेले यांची आई बिडी वळत होती. बाबासाहेबांनी शिका म्हटलं आणि दिगांबर बेले तहसीलदार बनून निवृत्त झाले. त्यांनी लेकरांना शिकवलं. मोठा मुलगा अजय अभियंता आहे. तर लहान मुलगा राजरत्न लेखाधिकारी आहे. बाबासाहेबांनी सांगितलेला उत्पन्नातील 20 टक्के समाजावर खर्च करा, हा संदेश त्यांनी आयुष्यभर पाळला. लघुवेतन कॉलनी उभारताना लागेल ती मदत केली. मुलांसाठी शिक्षणाचा खर्च करतात. त्यांच्या डायरीत आजही बाबासाहेबांचा फोटो आहे. ती डायरी छातीशी कवटाळून ठेवताना ते सांगतात, हा श्‍वास असेपर्यंत बाबासाहेब हृदयात असतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com