बच्चू कडू संतापले; जिल्हाधिकारी आणि आयुक्तांसमोरच पोलिस अधीक्षकांची केली कानउघडणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

पालकमंत्र्यांनी सार्वजनिकरित्या जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांची चांगलीच कानउघडणी केली. पोलिस कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणावर पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी पापळकर व मनपा आयुक्त कापडणीस यांच्या समोरच एसपींना सुनावल्याने उपस्थित सर्वच स्तब्ध झाले.

अकोला : महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच प्रतिबंधित क्षेत्रात (कंटेन्टमेंट झोन) नियुक्त पोलिस कर्मचारी कर्तव्यावर अनुपस्थित असल्याची राहत असल्याची बाब गुरुवारी (ता. 21) पालकमंत्री बच्चू कडू यांच्या निदर्शनात आली.

त्यामुळे पालकमंत्र्यांनी सार्वजनिकरित्या जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांची चांगलीच कानउघडणी केली. पोलिस कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणावर पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी पापळकर व मनपा आयुक्त कापडणीस यांच्या समोरच एसपींना सुनावल्याने उपस्थित सर्वच स्तब्ध झाले.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा विळखा वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. 21) पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्ह्यात पोहचून कोविड-19 संदर्भात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. त्यानंतर सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान ते रेडक्रॉस सोसायटीमार्फत कोरोना प्रतिबंधक परिणामकारक असलेल्या होमिओपॅथी औषधांच्या वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून निघाले.

यावेळी त्यांना बैदपूरा या प्रतिबंधित क्षेत्रात जाणाऱ्या रस्त्यांच्या सिल केलेल्या ठिकाणी नियुक्त पोलिस कर्मचारी अनुपस्थित असल्याचे दिसून आले. त्यांचा ताफा रिगल टॉकिज जवळून जात असताना त्यांना त्याठिकाणी सिल केलेल्या रस्त्यांवर एकही पोलिस कर्मचारी उपस्थित नसल्याचे दिसून आले. रेडक्रॉस कार्यालयाजवळ त्यांचा ताफा पोहचल्यानंतर त्यांना त्याठिकाणी बनवण्यात आलेल्या पोलिस टेंटमध्ये सुद्धा एकही पोलिस कर्मचारी उपस्थित नसल्याचे दिसून आले.

त्यामुळे पालकमंत्र्यांनी त्यांच्या सोबत रेडक्रॉसमध्ये पोहचलेले जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांची कानउघडणी केली. पोलिस कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांचा मुक्त संचार होत आहे. यासंबंधी वारंवार सूचना दिल्यानंतर सुद्धा आपण निष्काळजी करत असल्याचे पालकमंत्र्यांनी एसपींना सुनावले. पोलिस परिणामकारकरित्या जबाबदारी पार पाडत नाहीत, असे सुद्धा पालकमंत्री म्हणाले. रेडक्रॉस सोसायटी कार्यालयाच्या बाहेरच घडलेल्या या घटनेमुळे उपस्थितांना पालकमंत्र्यांच्या बेधड शैलीचे दर्शन झाले.

एसपी म्हणाले, देखता हूं, करता हूं
प्रतिबंधित क्षेत्रात नियुक्त पोलिस कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्याच्या प्रकारावर पालकमंत्री बच्चू कडू संताप व्यक्त करत असतानाच जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी देखता हूं, कारवाई करता हूं, अशा शब्दात पालकमंत्र्यांना उत्तरे दिली. त्यावर पालकमंत्र्यांनी यानंतर असा प्रकार निदर्शनास आल्यास मी गंभीरतेने घेईल, असा इशारा सुद्धा एसपींना दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bacchu kadu became very angry and the Superintendent of Police made a speech in front of the Collector and the Commissioner