esakal | 'चुलीत गेलं मंत्रिपद, उद्या राजीनामा देतो'; बच्चू कडू संतापले
sakal

बोलून बातमी शोधा

बच्चू कडू

'चुलीत गेलं मंत्रिपद, उद्या राजीनामा देतो'; बच्चू कडू संतापले

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

अकोला : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) आणि राज्यमंत्री बच्चू कडू (Minister Bachhu kadu) यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. मिटकरी यांनी अकोला जिल्हा परिषदेच्या निकाला उल्लेख करत पालकमंत्री बच्चू कडू हे भाजपच्या आमिषाला बळी पडले का? असा प्रश्न केला असता राज्यमंत्री बच्चू कडू हे चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी 'अमोल मिटकरी तुम्ही सिद्ध करून दाखवा. चुलीत गेलं ते मंत्रिपद, मी उद्या राजीनामा देऊन फेकतो', असे थेट व्यक्तव्य करत मिटकरी यांना फटाकरले.

हेही वाचा: Live : नागपुरात काँग्रेस विजयी, भाजपचा सुपडासाफ

अकोला जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा वंचितने आपला गड राखला आहे. खुद्द अमोल मिटकरी यांच्या गावात बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने राष्ट्रवादीचा पराभव केला आहे. हा पराभव मिटकरींच्या जिव्हारी लागल्याचे दिसून येते. त्याबाबत बोलताना ते म्हणाले, सर्वच पक्षांनी पोटनिवडणुकीच्या माध्यमातून आत्मचिंतन करावे. कुरघोडीचं राजकारण करू नये. महाविकास आघाडी एकत्र आली नाहीतर महापालिकेच्या निवडणुकांमध्ये अपयश येऊ शकतं, हे सर्वांनी लक्षात ठेवावं. बच्चू कडू हे शेतकरी नेते आहे. त्यांनी शेतकरी विरोधी पक्ष असलेल्या भाजपसोबत आतून गठबंधन केलं. मग ते महाविकास आघाडीचे मंत्री असताना त्यांनी असं का केलं? बच्चू कडू आणि आमच्यामध्ये समन्वय आहे की नाही हे सर्वांना माहिती आहे. पण, ते भाजपच्या आमिषाला बळी पडले का? असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला. ते टीव्ही ९ मराठीसोबत बोलत होते.

दरम्यान, बच्चू कडू यांनी मिटकरींवर जोरदार प्रहार केला. ''मिटकरी हा मोठा माणूस आहे, मी त्याच्याबाबत बोलू शकत नाही. मी आमिषाला बळी पडणारी औलाद नाही. ही माझी संस्कृती नाही. असं काही असेल तर मिटकरींनी सिद्ध करावे. हवेत आरोप कोणीही करू शकतात. मिटकरी हे बरोबर नाही. हे मी सहन नाही करणार. चुलीत गेलं ते मंत्रिपद. आमिषाला बळी पडणं म्हणजे काय असतं? ते मला आधी सांगा. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप सर्वच पक्ष वेगवेगळे लढले आहेत. मी कुठल्या आमिषाला बळी पडलो, ते सिद्ध करा. मी उद्या राजीनामा देऊन फेकतो. मला त्याची गरज नाही', असे बच्चू कडू म्हणाले.

loading image
go to top