
सिरोंचा (जि. गडचिरोली) : एकीकडे जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्येत घट होत जिल्ह्यातील कित्येक शाळा बंद पडल्या आहेत. मात्र, असे असताना आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे पालकांचा ओढ वाढत असतानासुद्धा सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम आसरअल्ली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने शैक्षणिक क्षेत्रात तालुक्यात आपले नाव लौकिक केले आहे. येथे 211 विद्यार्थी शिक्षण घेत असून नुकतीच या शाळेने शंभरी गाठली आहे.
"माझी शाळा-गावाची शान' अशी म्हण प्रचलित आहे. परंतु या म्हणीला सार्थक ठरविण्याचे कार्य सिरोंचा तालुक्यातील असरअल्ली येथील जिल्हा परिषदेची उच्च प्राथमिक शाळा करीत आहे. या शाळेची स्थापना 1914 मध्ये झाली. त्यावेळी येथे तेलुगू माध्यमाचे शिक्षण होते. या शाळेने 2014 मध्ये शताब्दी महोत्सवाचे आयोजन करून शाळेतील माजी विद्यार्थी जे शैक्षणिक, सामाजिक, व्यावसायिक क्षेत्रात कार्य करीत आहेत, अशांना सन्मानित करण्यात आले. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा बोलबाला असल्याने जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.
ही परिस्थिती जिल्ह्यात दुर्गम भागात दिसून येत असून पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा बंद पडल्या आहेत. अशा परिस्थितीत असरअल्ली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांसह शिक्षकवृंदांनी आपल्या श्रमाने व कल्पकतेने नावीन्यपूर्ण उपक्रमाची निर्मिती करून या शाळेचा चेहरामोहरा बदलला. मराठीसोबतच इंग्रजी विषयाकडे जातीने लक्ष देऊन विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी गोडी निर्माण केली.
त्यावेळी या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या 78 होती. मात्र, आज ती चार पटीने वाढून 211 वर पोचली आहे. एकीकडे घसरत्या पटसंख्येमुळे जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दुर्गम गावांमध्ये तर बिकट अवस्था बघायला मिळत आहे. अशा परिस्थितीत असरअल्ली येथील जिल्हा परिषद शाळेने इंग्रजी माध्यमांच्या शाळांसमोर आव्हान उभे केले आहे.
शिक्षणासोबतच शाळेचा परिसर स्वच्छ व सुंदर दिसावा यासाठी शिक्षकांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास, टिकण्यास, उपस्थिती वाढविण्यास प्रेरित करून असरअल्ली येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेला शैक्षणिक उपक्रम संशोधन केंद्र बनविले आहे. विद्यार्थ्यांना येणाऱ्या शैक्षणिक समस्यांचे उत्तर विविध उपक्रमांच्या माध्यमातून शोधले जाते. त्यामुळे गुरुजन व विद्यार्थ्यांत सलोख्याचे नाते जुळले आहे. मुख्याध्यापक खुर्शिद शेख आणि शिक्षकांनी केलेल्या परिश्रमामुळे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांसमोर आदर्श निर्माण केला असून तालुक्यातील नामांकित इंग्रजी शाळांनाही मागे टाकले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.