नाही पुस्तक नाही शाळा; केवळ आँनलाईनचाच आसरा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 April 2020

संचारबंदीसह टाळेबंदी असल्याने बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिवाय पुस्तकेही उपलब्ध नसल्याने अभ्यास कसा करावा याचीसुद्धा चिंता होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्याच अभ्यास करता येईल असा विचार करून बालभारतीने ही पुस्तके पीडीएफ स्वरूपात  http://www.ebalbharati.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहेत. परंतु हे संकेतस्थळ उघडत असले तरी ही पुस्तके मोबाईलमध्ये डाऊनलोड होत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. कदाचित मोबाईलमध्ये स्टोअरेजची क्षमता कमी असल्याने लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमध्ये ही पुस्तके डाऊनलोड होऊ शकतील,पण सर्वच विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरची सोय नसल्यामुळे अभ्यासात अडचण येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

मोहाड (जि. भंडारा) : कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला. यंदा बारावीच्या अभ्यासक्रमाची पुस्तके बदलली असली तरी कोरोनाच्या संकटामुळे बाजारात आलेली नाहीत. या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे साहित्य पीडीएफ स्वरूपात ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी बालभारतीचे संकेतस्थळ सुरू करण्यात आले. परंतु, लिंक ओपन होत असली तरी पीडीएफ डाऊनलोड होत नसल्याने वेबसाइटही लॉकडाऊनच्या प्रभावात असल्याचे चित्र आहे.

अवश्य वाचा - कोरोनामुळे या व्यवसायावरही संकट; करावे तरी काय?

संचारबंदीसह टाळेबंदी असल्याने बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिवाय पुस्तकेही उपलब्ध नसल्याने अभ्यास कसा करावा याचीसुद्धा चिंता होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्याच अभ्यास करता येईल असा विचार करून बालभारतीने ही पुस्तके पीडीएफ स्वरूपात  http://www.ebalbharati.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहेत. परंतु हे संकेतस्थळ उघडत असले तरी ही पुस्तके मोबाईलमध्ये डाऊनलोड होत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. कदाचित मोबाईलमध्ये स्टोअरेजची क्षमता कमी असल्याने लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमध्ये ही पुस्तके डाऊनलोड होऊ शकतील,पण सर्वच विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरची सोय नसल्यामुळे अभ्यासात अडचण येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

गेल्या महिन्याभरापासून शाळा बंद आहेत. पुस्तकेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे दहाव्या व बाराव्या वर्गात गेलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. उन्हाळा लागला असून कुलर,पंख्याच्या दुरुस्ती व विक्रीची कामे अडली आहेत. तेव्हा ही दोन्ही दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. संचारबंदीसह लॉकडाउनमुळे अत्यावश्‍यक सेवा सोडून सारेकाही कुलूपबंद आहे. घरातून बाहेर पडण्यास परवानगी नाही. या काळात विद्यार्थी कंटाळले आहे. खेळणे, मनोरंजन करूनही वेळ जात नाही. यावर्षी परीक्षा होण्यापूर्वीच शाळा बंद झाल्या. त्याचा फटका नवव्या व अकराव्या वर्गातील मुलांना बसला आहे. दरवर्षी निकाल लागण्यापूर्वीच विद्यार्थी दहावी व बारावीच्या तयारीला लागतात. शिकवणी वर्गही सुरू होतात.

परंतु, हा महिना निव्वळ वाया गेला आहे. मोबाइलवरुन ऑनलाइन पुस्तक वाचनाचाही पर्याय सुचविण्यात आला होता. परंतु, ग्रामीण भागात इंटरनेटचे नेटवर्क नेहमीच स्लो असते. त्यामुळे परिणामकारपणे हेतू साध्य होत नाही. मोबाइलवरुन पुस्तक वाचनाला मर्यादा आहेत. अधिक काळ त्यावर वाचन करणे शक्‍य नाही. परंतु, अभ्यासक्रमाची पुस्तकेच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांनी या माध्यमातून सातत्य ठेवले आहे. बारावीची परीक्षा कशीबशी आटोपली. दहावीचा समोर ढकलण्यात आलेला भूगोलाचा पेपर आता रद्द सुद्धा करण्यात आला. सीबीएसई शाळांचे पेपरसुद्धा अर्ध्यावरच थांबवून शाळांना सुट्या देण्यात आल्या. महाराष्ट्र शासनाच्या आधिपत्याखाली येणारे सर्वच शाळा-महाविद्यालये, तसेच व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र बंद करण्यात आले. पहिली ते 11 वी पर्यंतच्या सर्वच परीक्षा रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना समोरच्या वर्गात प्रवेश देण्यात आला आहे.

वर्षभर अभ्यास करून शेवटच्या क्षणाला परीक्षा न झाल्याने मुलांचा उत्साह मावळला. निकाल नाही, गुण नाही आणि थेट समोरच्या वर्गात प्रवेश ही अभ्यासू विद्यार्थ्यांच्या मानसिकतेला पटणारी गोष्ट नाही. आपण मेहनत घेतली त्याचा परिणाम काय निघाला याचे समाधान त्यांना यावर्षी मिळू शकले नाही. महिन्यांभरापासून घरातच बसून टी.व्ही. पाहणे, व्हिडिओ गेम खेळणे, इनडोअर गेम खेळणे, मोबाईलवर वेगवेगळ्या शैक्षणिक ऍपवरची माहिती घेणे हे काम विद्यार्थी करीत आहेत. परंतु, यामुळे पुस्तक वाचनाची सवय तुटण्याचीसुद्धा भीती आहे. दहावी, बारावीत गेलेले विद्यार्थी कमीत कमी पुस्तके तरी उपलब्ध व्हावी या प्रतीक्षेत आहेत.

ऑनलाइनचा उतारा

शाळा बंद झाल्याने घरातच बसून मोबाइलवर ऑनलाइनच्या माध्यमातून पुस्तके शोधून वाचन करण्याचा उपाय अनेकांनी शोधला. सीबीएसई शाळेतील शिक्षकांनी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोबाईल व्हॉट्‌स ऍप ग्रुपच्या माध्यमातून शिकविणे सुरू केले आहे. परंतु, शेवटी मोबाईल व पुस्तकाच्या शिकवण्यात फरक पडणारच. त्यातच सर्वांकडे अँड्रॉइड मोबाईल असेल असेही नाही. त्यामुळे शासनाने विचार करून बुकडेपो सुरू करण्याला अटी व शर्तीच्या आधीन राहून परवानगी देण्याची वा ऑनलाइन पुस्तके घरपोच पोहोचविण्यासाठी सवलत द्यावी अशी विद्यार्थी व पालकांची मागणी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: balbharati new books available online for students