पश्‍चिम विदर्भात पाच प्रकारच्या कीटकनाशकांवर बंदी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

अमरावती : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झालेल्या घटनेची गंभीर दखल घेऊन अमरावती महसूल विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पाच प्रकारच्या कीटकनाशकांची पुढील दोन महिन्यांसाठी विक्री, वितरण व वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली.

अमरावती जिल्ह्यात नमूद कीटकनाशके व त्यांच्या मिश्रणाच्या वापरामुळे शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाली होती. ही कीटकनाशके अतिविषारी असून त्यांचा अनधिकृतपणे संमिश्रणासाठी वापर केल्यामुळे त्यांचा प्रभाव अधिक विषारी होत असल्याचे दिसून आले आहे. या कीटकनाशकांमध्ये प्रोफेनोफोस 40 टक्‍के अधिक सीपरमेथ्रीन 40 टक्‍के ईसी, फिप्रोनील 40 टक्‍के अधिक इमीडॅक्‍लोप्रीड 40 टक्‍के डब्युजी, एसिफेट 75 टक्‍के एससी, डिफेन्थीरोन 50 टक्‍के डब्ल्यूपी, मोनोक्रोटोफॉस 36 टक्‍के एसएल आदींचा समावेश आहे. कीटकनाशकामुळे विषबाधा झालेल्या घटनेची दखल घेऊन केंद्र शासनाकडून चौकशी पूर्ण होईपर्यंत अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या कालावधीकरिता कीटकनाशके व त्यांच्या मिश्रणाची विक्री, वितरण व वापर करण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे कृषिमंत्री बोंडे म्हणाले.
धोकादायक कीटकनाशकांची विक्री, वितरण व वापर यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठी केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती, फरिदाबाद यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून कीटकनाशकामुळे विषबाधा झालेल्या शेतकरी व शेतमजुरांवर उपचार सुरू असल्याचे डॉ. बोंडे यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ban on sale of five types of pesticides in western Vidarbha