केळी जातात दिल्लीला, भाजीपाला आंध्रात

गणेश भोयर
रविवार, 6 मे 2018

महागाव (जि. यवतमाळ) - सिंचनासाठी पुरेसे पाणी नाही, म्हणून अनेक शेतकरी कोरडवाहू शेती करतात. मात्र, तालुक्‍यातील माळकिन्ही येथील शेतकऱ्यांनी अत्यल्प पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करून बागायती शेती केली आहे. येथे पिकणारी केळी थेट दिल्लीला जातात, तर भाजीपाला आंध्र प्रदेश व नागपूरला जातो. भाजीपाला उत्पादकांचे गाव म्हणून माळकिन्हीची पंचक्रोशीत आगळीवेगळी ओळख निर्माण झाली आहे.

महागाव (जि. यवतमाळ) - सिंचनासाठी पुरेसे पाणी नाही, म्हणून अनेक शेतकरी कोरडवाहू शेती करतात. मात्र, तालुक्‍यातील माळकिन्ही येथील शेतकऱ्यांनी अत्यल्प पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करून बागायती शेती केली आहे. येथे पिकणारी केळी थेट दिल्लीला जातात, तर भाजीपाला आंध्र प्रदेश व नागपूरला जातो. भाजीपाला उत्पादकांचे गाव म्हणून माळकिन्हीची पंचक्रोशीत आगळीवेगळी ओळख निर्माण झाली आहे.

तालुक्‍यातील माळकिन्ही येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. या गावाची लोकसंख्या २६०० असून येथील ८० टक्के लोक शेती करतात. या गावातील दोन व्यक्ती शिक्षक व एक राज्य राखीव पोलिस दलात नोकरीला आहे. गावात जिल्हा परिषदेची आठवीपर्यंतची शाळा आहे. येथील दत्त संस्थान ही गावाची ऐतिहासिक ओळख आहे. येथील बहुसंख्य कुटुंबे ही माळी व वाणी समाजाची आहेत. सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. गावात कुठल्याही प्रकारचे तंटे होत नाहीत. गावात प्रवेश करतानाच पश्‍चिम महाराष्ट्रातील गावांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कारण बहुतेक शेतकऱ्यांनी शेतातच आपला घरसंसार थाटला आहे. शेतात राहूनच ते पिकांची देखरेख करतात. या गावातील शेतकरी बागायती शेती करतात. भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात पीक घेतात. 

त्यात मुख्यत्वे टमाटर, वांगे, कोबी, दोडके, काकडी, कोथिंबीर, भेंडी, कारले व कांदा आदींचे पीक घेतात. नारायण खंदारे, गजानन काळे, संजय काळसरे, शिवजी कानडे, बाळू पाटील, विठ्ठल दैत आदी भाजीपाल्याची शेती करतात तर काही शेतकरी केळीची बागायती शेती करतात. तणाचा प्रादुर्भाव व जमिनीची धूप होऊ नये, म्हणून हे पीक मल्चिंग पेपरवर घेतले जाते, हे विशेष. येथील भाजीपाला आंध्र प्रदेशातील हैदराबाद तसेच नागपूर, वर्धा व अमरावती आदी शहरांमध्ये पाठविला जातो. ज्या ठिकाणी चांगला भाव मिळेल, त्या शहराच्या बाजारात येथील शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी नेतात. येथील केळी प्रसिद्ध आहे. लक्ष्मण मदने, गजानन काळकर, रामराव खंदारे, भीमराव मत्ते, गजानन खंदारे आदी शेतकरी केळीची शेती करतात. त्यांनी एकरी ३० टनांपर्यंत उत्पन्न घेण्याचा विक्रम  केला आहे. सेंद्रिय पद्धतीने केळी पिकवली जाते. त्यामुळे या केळीला अतिशय मागणी असते.

ही केळी चवीला गोड असून रासायनिक पदार्थांचा पिकविण्यासाठी वापर होत नसल्याने ती बाजारात हातोहात विकली जाते. विशेषतः येथील शेतकरी केळी देशाची राजधानी दिल्लीच्या बाजारात नेतात. त्याठिकाणी केळीला चांगला भाव मिळतो. भाजीपाला व बागायती शेती नगदी पिकांचे स्रोत असल्याने येथील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. अत्यल्प पावसाचे योग्य नियोजन करून येथील शेतकऱ्यांनी बागायती शेती करून दाखविली. साखर कारखान्याच्या क्षेत्रातील हे गाव असले तरी येथील शेतकरी मात्र उसाकडे वळले नाहीत. त्यांनी हुकमी पीक म्हणून भाजीपाला व केळीलाच महत्त्व दिले आहे. त्यांच्या या प्रयोगामुळे येथील पाचशे कुटुंबे सुख, समृद्धीत नांदत आहेत. या गावात आजपर्यंत कधीही शेतकरी आत्महत्या झालेली नाही. इतर शेतकऱ्यांसाठी हे गाव म्हणजे एक आदर्शच ठरेल असे आहे.

शीप नदीवर बंधारा हवा
माळकिन्ही गावाजवळून शीप नदी वाहते. आता ती कोरडी पडली आहे. पावसाळ्यातील पाणी वाहून जाते. नदीवर बंधारा बांधून पाणी अडविल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे नदीवर त्वरित बंधारा बांधावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

भाजीपाला उत्पादनास खर्च जास्त येतो. शिवाय गारपीट व अवकाळी पावसासारखे नैसर्गिक संकट यामुळेही पिकांचे मोठे नुकसान होते. अशा परिस्थितीत लागवडीचाही खर्च निघत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतात. शासनाने शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव अधिक पन्नास टक्के नफा व  नैसर्गिक संकट आल्यास विम्याचा लाभ मिळवून दिला तरच शेतकरी जिवंत राहू शकतील.
-उत्तमराव चिंचोलकर, उपसरपंच, माळकिन्ही, ता. महागाव

Web Title: banana vegetable delhi andhra pradesh