नवोदय बॅंक घोटाळा; माजी आमदार धवड यांचा सात दिवस पीसीआर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 November 2019

 

 नागपूर : नवोदय बॅंकेत कोट्यवधींचा घोटाळा करणारे माजी आमदार तथा बॅंकेचे अध्यक्ष अशोक धवड यांना न्यायालयाने सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अशोक धवड यांना मंगळवारी मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेण्यात आले होते. 

 

 नागपूर : नवोदय बॅंकेत कोट्यवधींचा घोटाळा करणारे माजी आमदार तथा बॅंकेचे अध्यक्ष अशोक धवड यांना न्यायालयाने सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अशोक धवड यांना मंगळवारी मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेण्यात आले होते. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धंतोलीतील सिल्व्हर पॅलेस येथील नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेतील 38.75 कोटींच्या घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी माजी आमदार आणि बॅंकेचे अध्यक्ष अशोक धवड यांच्यासह बॅंकेच्या अन्य पदाधिकाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल केले होते. 2010 ते 2015 या कालावधीत नवोदय बॅंकेचे तत्कालीन संचालक मंडळ, पदाधिकाऱ्यांनी बॅंकेच्या ठराविक कर्जदारांना विनाकारण कर्ज दिले. तसेच काही कर्जदारांकडे थकबाकी असतानाही त्यांना नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येऊन त्यांनी तारण ठेवलेल्या मालमत्तेचे दस्तऐवज परत करण्यात आले. काही वादग्रस्त मालमत्ता तारण ठेवून संचालक मंडळाने कर्जदारांना कर्ज दिले होते. संचालक व पदाधिकाऱ्यांनी बॅंकेतून पैशांची उचल केली. तसेच रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध घातल्यानंतरही पदधिकाऱ्यांनी बॅंकेचे आर्थिक व्यवहार सुरूच ठेवले होते. संचालक मंडळ, पदाधिकारी व काही कर्जदारांनी या कालावधीत 38 कोटी 75 लाख 20 हजार रुपयांचा घोटाळा केला. सहकारी संस्थेचे जिल्हा विशेष परीक्षक (भंडारा) श्रीकांत सुपे यांनी केलेल्या अंकेक्षणानंतर हा घोटाळा उघडकीस आला होता. सुपे यांच्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी मे 2019 महिन्यात बॅंकेचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ, पदाधिकारी व काही कर्जदारांविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून अटक टाळण्यासाठी धावपळ करीत होते. त्यांनी जामीन मिळविण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, हायकोर्टाने त्यांचा जामीन फेटाळला होता. त्यानंतर धवड यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळला होता. 
त्यांना पोलिसांना शरण जाण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ न्यायालयाने दिला होता. अवधी संपल्यामुळे धवड यांनी न्यायालयात आत्मसमर्पण केले होते, हे विशेष. न्यायालयाने त्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली होती. आज बुधवारी पोलिसांनी प्रॉडक्‍शन वॉरंटवर ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात उपस्थित केले. न्यालयाने त्यांना सात दिवस (ता. 13) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bank scam, ashok dhawad given police custody