मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातील बँक बंदचे संकट दूर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 March 2020

कर्मचाऱ्यांचा तीन दिवसांचा प्रस्तावित संप तुर्तास मागे; शासनाकडून बहुतांश मागण्यांवर सकारात्मक निर्णय
 

अकोला : आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना आणि बँकांमध्ये गर्दी ठरलेलीच. नेमके हीच संधी साधून मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात 11 ते 13 असे तीन दिवस सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे कर्मचारी संपावर जाणार होते. हे दिवस शासकीय व साप्ताहिक सुटीला लागून असल्याने आठवड्यात सहा दिवस बँका बंद राहण्याची शक्यता होती. मात्र कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्याने संप मागे घेण्यात आला. त्यामुळे आठवडाभर बँक बंदचे संकट तुर्तास टळले आहे.

 

अर्थसंकल्पाच्या दिवशी (1 फेब्रुवारी) आणि त्यापूर्वी एक दिवस आधी (31 जानेवारी) देशभरातील बँकांनी संप पुकारला होता. या संपात बँक कर्मचाऱ्यांनी केलेल्या मागण्यांचा विचार झाला नाही. त्यामुळे बँक कर्मचारी संघटनांनी मार्चमध्ये पुन्हा तीन दिवसांच्या संपावर जाण्याचा इशारा दिला होता. बँक एम्प्लॉयी फेडरेशन ऑफ इंडिया (बीईएफआय) आणि ऑल इंडिया बँक एम्प्लॉयी असोसिएशन (एआयबीईए) यांच्या वतीने संपाचा इशारा देण्यात आला होता.

बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार झाला नाही तर, सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांचे कर्मचारी 11 ते 13 मार्च दरम्यान तीन दिवसांच्या संपावर जाणार होते. त्यापूर्वी मंगळवार, 10 मार्च रोजी धुलिवंदनानिमित्त सुट्टी आणि संपाच्या तीन दिवसांनंतर 14 मार्चला दुसरा शनिवार असून, 15 मार्चला रविवार आहे. त्यामुळे बँका सलग सहा दिवस बंद राहणार होत्या. दुसऱ्या आठवड्यात केवळ सोमवार, 9 मार्चला एकच दिवस बँका सुरू राहणार होती. त्यानंतर थेट पुढल्या सोमवारी, 16 मार्चलाच बँका उघडणार होत्या. बँक ग्राहकांसाठी हीबाब गैरसोयीची ठरणार होती. होळी व धुळीबंदनाचा सण आणि लग्नसराईसह परीक्षेचा काळ त्यामुळे ग्राहकांना रोख रकमेची चणचण भासणार हे निश्‍चितच होते. अखेर 29 फेब्रुवारी रोजी बँक कर्मचारी संघटनांसोबत झालेल्या चर्चेत शासनाने काही अडचणीच्या मागण्या वगळता बहुतांश मागण्या मान्य केल्यात. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांनी संप तुर्तास मागे घेतला आहे.

यासाठी जाणार होते बँक कर्मचारी संपावर
दर पाच वर्षांनी वेतनाचा आढावा घेऊन त्यामध्ये वाढ करण्यात यावी, अशी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. सन 2012 मध्ये वेतनवाढ करण्यात आली होती. त्यानंतर पुढील वेतनवाढ 2017 मध्ये होणे अपेक्षित होती. ती अद्याप झाली नाही. त्यात 15 टक्केपर्यंत वाढ केली जाण्याची शक्यता आहे. आठवड्यात दोन दिवस सुट्टी देण्याचीही मागणी संघटनांनी केली होती. त्यावर विचार करण्यासाठी व कायदेशीर बाजू तपासण्यासाठी हा विषय संबंधित विभागांकडे पाठविण्यात आला आहे. याशिवाय विशेष भत्त्यांना मूळ वेतनाशी जोडले जाण्याचीही मागणी करण्यात आली होती. नवीन निवृत्ती वेतन योजना संपुष्टात आणून कौटुंबिक निवृत्ती वेतनामध्ये सुधारणा घडवून आणण्याची सूचना करण्यात आली. यातील बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्यात. उर्वरित मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर युनायटेट फोरम ऑफ बँक युनियनने तीन दिवसांचा संप तुर्तास मागे घेतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bank shutdown crisis off in second week of March