
पुसदमध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पुसद शहर व श्रीरामपूर, काकडदाती, धनकेश्वर, शेंबाळपिंपरी, बेलोरा, जांब बाजार, वरुड, गायमुखनगर या आठ ग्रामपंचायत क्षेत्रात ३ मार्च ते ८ मार्चच्या मध्यरात्री पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले.
श्रीरामपूर (जि. यवतमाळ) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुसद शहर व लगतच्या आठ ग्रामपंचायत क्षेत्रात कडक संचारबंदी लावण्यात आली आहे. हे योग्य असले तरी, अत्यावश्यक वगळता इतर व्यवसायांबरोबरच बँकांचे व्यवहार तब्बल सहा दिवस बंद ठेवल्यामुळे सामान्य नागरिक व किरकोळ व्यावसायिकांबरोबरच वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा - सावधान! फोन करून त्रास देऊ नका; यवतमाळमध्ये याच कारणावरून झाला युवकाचा खून
पुसदमध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पुसद शहर व श्रीरामपूर, काकडदाती, धनकेश्वर, शेंबाळपिंपरी, बेलोरा, जांब बाजार, वरुड, गायमुखनगर या आठ ग्रामपंचायत क्षेत्रात ३ मार्च ते ८ मार्चच्या मध्यरात्री पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले. या कालावधीत सर्व प्रकारची जीवनावश्यक दुकाने, किराणा, स्वस्त धान्य दुकाने सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता बॅंकांचे व्यवहार बंद ठेवण्यात आले असून केवळ बॅंकेचे कर्मचारी त्यांचे अंतर्गत कार्यालयीन कामकाज बँकेत उपस्थित राहून करू शकतील, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बॅंकांचे व्यवहार ठप्प असल्याने ए.टी.एम., फोन पे, गुगल पे व ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करू न शकणाऱ्यांना मात्र बॅंका बंदचा त्रास होत आहे. वैद्यकीय शिक्षणासाठीच्या शेवटच्या फेरीत हवे असलेले महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना आपली अॅडमिशन पक्की करण्यासाठी आवश्यक असलेला डी.डी. काढून ७ मार्चपर्यंत जमा करणे आवश्यक केले आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खात्यात रक्कम असली तरी पुसदमधील बॅंकांचे आर्थिक व्यवहार बंद असल्याने डी. डी. कसा काढावा व तो विहित मुदतीत महाविद्यालयात जमा न केल्यास दोन वर्षे रात्रंदिवस मेहनत करून डॉक्टर होण्याचे पाहिलेले स्वप्न भंग होते की काय, असाही प्रश्न विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना पडला आहे.