आणखी तीन दिवस बँका बंद; जाणून घ्या कारण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 February 2020

अद्याप बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार न झाल्याने मध्यंतरीच्या काळातही बंद पुकारला होता. आता सुरळीत सुरू असताना आणखी तीन दिवस बँका बंद राहणार आहेत.

अकोला : फेब्रुवारी महिन्यात बँकांना बंदचे ग्रहणच लागलेले दिसून येत आहे. अर्थसंकल्पाच्या दिवशी आणि त्यापूर्वी एक दिवस आधी देशभरातील बँकांनी संप पुकारला होता. मात्र, अद्याप बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार न झाल्याने मध्यंतरीच्या काळातही बंद पुकारला होता. आता सुरळीत सुरू असताना आणखी तीन दिवस बँका बंद राहणार आहेत.

बँक एम्प्लॉयी फेडरेशन ऑफ इंडिया (बीईएफआय) आणि ऑल इंडिया बँक एम्प्लॉयी असोसिएशन (एआयबीईए) यांच्या वतीने संपाचे हत्यार उपसण्यात येणार आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार झाला नाही तर, सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांचे कर्मचारी 11 ते 13 मार्च दरम्यान तीन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. त्यापूर्वी 10 मार्च रोजी धुलिवंदनानिमित्त सुट्टी आहे. तर संपानंतर 14 मार्चला दुसरा शनिवार असून, 15 मार्चला रविवार आहे. त्यामुळे बँका सलग सहा दिवस बंद राहण्याची शक्यता आहे.

दर पाच वर्षांनी वेतनाचा आढावा घेऊन त्यामध्ये वाढ करण्यात यावी, अशी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. 2012 मध्ये वेतनवाढ करण्यात आली होती. त्यानंतर पुढील वेतनवाढ 2017 मध्ये होण्याची अपेक्षा होती. मात्र, ती झाली नाही. या शिवाय आठवड्यात दोन दिवस सुट्टी देण्याचीही मागणी संघटनांनी केली आहे. या शिवाय विशेष भत्त्यांना मूळ वेतनाशी जोडले जाण्याचीही मागणी करण्यात आली आहे. नवीन पेन्शन योजना संपुष्टात आणून कौटुंबिक पेन्शनमध्ये सुधारणा घडवून आणण्याची सूचना करण्यात आली आहे.

महत्त्वाची बातमी - नोकरीचे आमीष दाखवून लाखोंचा गंडा

सलग तीन दिवस सुट्ट्या
अशातच फेब्रुवारी महिन्यात बुधवार 19 फेब्रुवारी शिवजयंतीची बँकांना सुटी आहे. आता एक दिवस सोडून शुक्रवार 21 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री, त्यानंतर चौथा शनिवार व रविवार अशा सलग तीन दिवस सुट्या राहणार आहे. राज्यातील बँकांच्या सुट्यांचा फटका ग्राहकांना बसत असून, आताही तीन दिवस असाच त्रास सहन करावा लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: banks closed for tree consecutive days in february