सालेकस्यात बॅंकांना "लिंक फेल'चा दणका..सांगा कसे मिळणार शेतकऱ्यांना कर्ज

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये वारंवार लिंक फेल होत असल्याने शेतकरी, मजूर, ग्राहकांची कामे अडली आहेत. मात्र या अडचणींकडे बॅंक व्यवस्थापन लक्ष द्यायला तयार नाही, असा आरोपही खातेदारांनी केला आहे. बॅंकेत पीककर्ज, पैसे काढण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.

सालेकसा (जि. गोंदिया) : गेल्या अनेक दिवसांपासून येथील बॅंकांमध्ये सर्वसामान्य ग्राहकांना "लिंक फेल'चा फटका बसत असल्याने देवाणघेवाण व्यवहार ठप्प झाले आहेत. सध्या पावसाळा सुरू असल्याने शेतकरी पीककर्ज उचल करण्याकरिता बॅंकेमध्ये वारंवार चकरा मारत आहेत. मात्र याकडे बॅंक व्यवस्थापक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

सालेकसा येथील डिस्ट्रिक्‍ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बॅंकेमध्ये अंदाजे 20 ते 22 हजार खातेधारक आहेत. तसेच येथे ग्रामपंचायतचे संयुक्त खाते, शिक्षक, तलाठी, शेतकरी, मजूर, व्यापाऱ्यांचेही विविध प्रकारचे खाते आहेत. मात्र बॅंकेत वारंवार लिंक फेल होत असल्यामुळे खातेधारकांना पैसे काढण्यात अडचण निर्माण झाली आहे.

खातेदारांना फटका

त्यामुळे आर्थिक व्यवहार कसा करावा व शेतीकरिता लागणारे सामान कुठून आणावे, असा सवाल शेतकऱ्यांसह खातेदारांना पडलेला आहे. सालेकसा तालुक्‍यात 92 गावे असून राष्ट्रीयीकृत बॅंक महाराष्ट्र असल्यामुळे तिथेसुद्धा "लिंक फेल'चा फटका बसत आहे.

शेतकऱ्यांना त्वरित कर्ज मिळावे

सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बॅंकेत गर्दी वाढत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडत आहे. याकडे पोलिस विभाग, बॅंक मॅनेजर यांचेही दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे बॅंकांनी ग्राहकांच्या अडचणी लक्षात घेऊन बॅंकेत सोयीसुविधा निर्माण कराव्यात, शेतकऱ्यांना त्वरित कर्ज मिळवून द्यावे, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.

असं घडलंच कसं : एकोणवीस वर्षीय युवती तोकड्या कपड्यात चार युवकांसह अन् धुव्वाच धुव्वा, पुढे...

समस्या "जैसे थे'च
प्रत्यक्षात माहिती घेतली असता लिंक फेलचा फटका वारंवार बसत आहे, अशी सूचना वरिष्ठ जिल्हा शाखा व्यवस्थापक यांच्याकडे केली आहे. मात्र त्यानंतरही समस्या "जैसे थे'च आहे. आठवड्यातून केवळ एक ते दोन दिवस व्यवहार सुरू असतो.
- एस. के. उईके, शाखा व्यवस्थापक, डिस्ट्रिक्‍ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बॅंक, सालेकसा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Banks "link fail" in gondia Farmer trouble