रस्त्यांसाठी बारदान्याची गुजरातमधून आयात

रामेश्‍वर काकडे
रविवार, 30 डिसेंबर 2018

स्थानिक व्यावसायिकांवर बेरोजगारीचे संकट; एक किमीसाठी लागतात 40 हजार पोती
वर्धा : विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत सुरू असलेल्या महामार्गाच्या सिमेंट रस्त्याच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात बारदान्याचा उपयोग करण्यात येत आहे. त्याची खरेदी महाराष्ट्रातून न करता कंत्राटदार गुजरातेतून आयात करीत असल्याने स्थानिक व्यावसायिकांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे.

स्थानिक व्यावसायिकांवर बेरोजगारीचे संकट; एक किमीसाठी लागतात 40 हजार पोती
वर्धा : विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत सुरू असलेल्या महामार्गाच्या सिमेंट रस्त्याच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात बारदान्याचा उपयोग करण्यात येत आहे. त्याची खरेदी महाराष्ट्रातून न करता कंत्राटदार गुजरातेतून आयात करीत असल्याने स्थानिक व्यावसायिकांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे.
भाजप-शिवसेनेच्या काळात राज्यभरात मोठ्या संख्येने समृद्धी महामार्गासह, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा महामार्ग याशिवाय गावखेड्यातील तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांची कामे धूमधडाक्‍यात सुरू आहेत. डांबरी रस्त्याऐवजी सरकारने सिमेंट रस्त्याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सर्वत्र सिमेंट रस्त्याचीच कामे सुरू आहेत. रस्त्याचे बांधकाम केल्यानंतर त्यामध्ये पाणी मुरण्यासाठी जुटच्या पोत्यांची क्‍युरींग केली जाते. त्यामुळे बारदान्याची मागणी वाढली असून गेल्या पाच वर्षांत पोत्यांच्या दरात जवळपास तीन ते चार पटीने वाढ झालेली आहे. स्थानिक बाजारपेठेत 17 ते 20 रुपयापर्यंत जुटच्या एका बारदान्याची किंमत आहे. परंतु हेच बारदाने गुजरातमध्ये 15 ते 16 रुपयाला मिळत आहे. कंत्राटदारांकडून पोत्यांची खरेदी केली जात आहे. सध्या नागपूर ते नांदेड या महामार्गाचे शिवाय नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी लागणारे जुटचे पोते गुजरात येथून आणण्यात येत आहेत. एक किमी सिमेंट रस्त्यासाठी चार ट्रक बारदाना लागतो. एका ट्रकमध्ये 10 हजार म्हणजे एक किमी रस्त्यासाठी 40 हजार पोत्यांची आवश्‍यकता भासते. पाच वर्षांपूर्वी राज्यात आईलमिल जास्त होत्या, तेव्हा बारदान्याचा भाव पाच ते सहा रुपयांवर होता. मात्र, रस्त्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने आजघडीला 18 ते 20 रुपयांवर भाव येऊन ठेपला आहे.
प्लॅस्टिक पोत्यामुळे मागणी घटली
यापूर्वी अन्नधान्य साठवणुकीपासून ते सर्वच कामांसाठी जुटच्या बारदान्याचा उपयोग केला जायचा. हे पोते 17 ते 18 रुपयाला मिळायचे. मात्र, प्लॅस्टिकचे पोते 2 ते 5 रुपयालाच मिळत असल्याने बारदान्याची मागणी कमी झाली होती.
शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड
सिमेंट रस्त्याच्या कामामुळे गेल्या पाच वर्षांत दरात मोठी वाढ झाल्याने त्याचा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना बसत आहे. 50 किलो धान्य साठविण्यासाठी 20 रुपयाला एक पोते विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

कंत्राटदार गुजरात राज्यातून 15 ते 16 रुपये दराने बारदान्याची आयात करीत आहेत. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना त्याचा फटका बसत आहे. त्यासाठी जेथे काम सुरू आहे, तेथूनच खरेदी करणे कंत्राटदारांना बंधनकारक करावे.
- जयसिंग भारद्वाज, बारदाना व्यापारी, वर्धा.

Web Title: Bardana imported from Gujarat