मुलांशी संवाद साधण्यासाठी चांगले श्रोते व्हा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

नागपूर : मुलांचे बालपण फार साधे असते. त्यांनी मोठ्यांप्रमाणे वागावे अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. त्यांच्याशी संवाद साधणे म्हणजे, त्यांच्या मनात काय सुरू आहे हे जाणून घेणे असते. दुर्दैवाने पालक आपल्या पाल्यांकडून अपेक्षाच करीत असतात. त्यामुळे मुलांमधला निरागसपणा कमी होतो आहे. कमीत-कमी मुलांसाठी चांगले श्रोते व्हा, असे आवाहन प्रसिद्ध गीतकार डॉ. सलील कुळकर्णी यांनी व्यक्‍त केले.

नागपूर : मुलांचे बालपण फार साधे असते. त्यांनी मोठ्यांप्रमाणे वागावे अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. त्यांच्याशी संवाद साधणे म्हणजे, त्यांच्या मनात काय सुरू आहे हे जाणून घेणे असते. दुर्दैवाने पालक आपल्या पाल्यांकडून अपेक्षाच करीत असतात. त्यामुळे मुलांमधला निरागसपणा कमी होतो आहे. कमीत-कमी मुलांसाठी चांगले श्रोते व्हा, असे आवाहन प्रसिद्ध गीतकार डॉ. सलील कुळकर्णी यांनी व्यक्‍त केले.
ओम चॅरिटेबल ट्रस्ट व ओबेगा हॉस्पिटल यांच्या संयुक्‍त विद्यामाने "को जागर्ति ?' भूल आणि मूल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. सलील देशमुख यांची रेणुका देशकर यांनी मुलाखत घेतली. याप्रसंगी मंचावर इंडियन सोसायटी ऑफ ऍनेस्थेशिया विभागाच्या अध्यक्ष डॉ. मनीषा शेंबेकर व ओम चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. चैतन्य शेंबेकर उपस्थित होते. याप्रसंगी सलील कुळकर्णी यांनी पालकांचा मुलांशी असलेला संवाद संपत असल्याची खंत व्यक्‍त केली. नेहमी मुलांनी हातात मोबाईल घेतला की, पालक संतप्त होतात. मात्र, जरा भूतकाळाकडे बघा, याच पालकांनी मुलांच्या हाती खेळणे म्हणून मोबाईल दिला असल्याचे मत यावेळी सलील कुळकर्णी यांनी व्यक्‍त केले. लहान मुलांना पाण्याची बादली अन्‌ माती याशिवाय दुसरा चांगला कोणता खेळ राहूच शकत नसल्याचे ते म्हणाले.
तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक मुलाच्या हाती मोबाईल दिसतो आहे. पण, या मोबाईलपेक्षा घरातील आजी आजोबांकडे जास्त माहिती संग्रह असल्याचे सांगताना, मुलांना आजी-आजोबांची गोडी लावण्याचे आवाहन डॉ. सलील कुळकर्णी यांनी केले. रियालिटी शोमध्ये पाल्य गेला की, त्याच्यामुळे आपण प्रसिद्धीच्या झोतात येऊ अशी काहीशी भावना पालकांची होत असून, या गराड्यात मुलांचे बालपण हरवत असल्याचे सलील कुळकर्णी यांनी सांगितले. असे अनेक विषयांवर मत नोंदवताना त्यांनी "एकटी एकटी घाबरलीस ना आई' यासह अनेक कवितांचे सादरीकरण केले.

मातृत्व हेच करिअर करा
अनेक स्त्रिया चांगल्या करिअरसाठी मातृत्व पुढे ढकलतात. मात्र, असे केल्याने त्यांच्या अन्‌ बाळाच्या दोघांच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे योग्य वयात प्रत्येक स्त्रीने मातृत्वाचा स्वीकार करणे गरजेचे आहे. त्यासाठी मातृत्व हेच करिअर म्हणून स्वीकारण्याची तयारी असली पाहिजे, असे मत डॉ. चैतन्य शेंबेकर यांनी व्यक्‍त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Be a good listener to interact with children