शेतातील मजुराला डांबून पीक पेटवले; शेतजमीन उखरून काढली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

आरोपींनी काठ्या व लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याला शेतातील घरात कोंडले व शेतात कापणी झाल्यानंतर ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला आग लावली.

हिंगणा, (जि. नागपूर)  : शेतात एकट्या असलेल्या मजुराला खोलीत डांबून शेतातील संपूर्ण सोयाबीनचे पीक पेटवले. त्यानंतर शेतातील पिकावर जेसीबी फिरवून उर्वरित पीक नेस्तनाबूद केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी सात आरोपींना अटक केली. 

अक्रम खान अकबर खान (वय 24, रा. मोठा ताजबाग), कुणाल प्रदीप पांडे (वय 24, रा. प्रेमनगर), रिषभ ललित श्रीवास्तव (वय 24, रा. जुनी पारडी), शमशान शज्जाद शेख (वय 33, रा. भांडेवाडी), हेमंत नारायण अवधूत (वय 40, रा. शांतीनगर), आशीष प्रकाश मडावी (वय 25, रा. सिरसपेठ), अमरसिंग मनोजसिंग तोमर (वय 29, रा. खरे टाउन, धरमपेठ, सर्व रा. नागपूर) अशी आरोपींची नावे आहेत.

काठ्या व लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण
हे सातही जण गुरुवारी सायंकाळी सुमठाणा शिवारातील नरेंद्र गायकवाड यांच्या शेतात मोटारसायकल व जेसीबी घेऊन पोहोचले. त्यावेळी तिथे वास्तव्यास असलेला शेतमजूर शंकर रामभाऊ बर्डे (मूळगाव बरबडी, जि. वर्धा) हा एकटाच होता. सुरवातीला शंकरला आरोपींनी काठ्या व लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याला शेतातील घरात कोंडले व शेतात कापणी झाल्यानंतर ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला आग लावली. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने संपूर्ण शेतजमीन उखरून काढली.

कसाबसा पोहोचला पोलिस ठाण्यात
शेतमजुराला आरोपीने खोलीबाहेर काढून मोटारसायकलवर बसवून इतरत्र नेले. मात्र, तो त्यांच्या तावडीतून सुटला व कसाबसा शुक्रवारी पहाटे हिंगणा पोलिस ठाण्यात पोहोचला. पोलिस उपनिरीक्षक एम. बी. डोईफोडे यांनी त्याची तक्रार दाखल करून तत्काळ स्टाफला घेऊन घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळावरून सातही आरोपींना ताब्यात घेतले. फिर्यादी शंकर बर्डे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगणा पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास ठाणेदार सारीन दुर्गे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक एम. बी. डोईफोडे करीत आहेत. 

प्रॉपर्टीच्या वादावरून घटना? 
ही घटना प्रॉपर्टीच्या वादातून घडल्याची चर्चा आहे. शेतमालक गायकवाड यांचा एका व्यक्तीसोबत शेतीच्या पार्टनरशिपवरून वाद झाला व त्याने भाडोत्री गुंड पाठविले असावेत, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली असून त्या दिशेने पोलिस आरोपींना विचारपूस करीत आहेत. अद्याप आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली नाही.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: beating laborers burned crop in hingana