esakal | विदर्भात काय कमी हायबे, मुख्यमंत्रीच आपला हाय : भारत गणेशपुरे
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूर : महापालिकेद्वारा आयोजित इनोव्हेशन पर्वात "स्टार्टअप फेस्ट'चे उद्‌घाटन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; बाजूला मराठी हास्य अभिनेते भारत गणेशपुरे, अभिनेते संदीप कुळकर्णी व मान्यवर.

विदर्भात काय कमी हायबे, मुख्यमंत्रीच आपला हाय : भारत गणेशपुरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विदर्भात कायचीच कमतरता नाही. इथं भरभरून टॅलेंट पडले आहे. आतातर मुख्यमंत्रीबी विदर्भाचाच हाय... असे खास वऱ्हाडी भाषेत सांगून सुप्रसिद्ध हास्य कलावंत आता आपण वैदर्भी कला अकादमी स्थापन करून रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. वैदर्भीयांनी कुठलाच न्युनगंड बाळगू नये, असा सल्लाही त्यांनी युवकांना दिला. महापालिकेच्या ईनोव्हेशन पर्व-2च्या उद्‌घाटनासाठी ते आले होते. मुंबई, पुण्याकडील निर्माते व दिग्दर्शक येथे येण्यासाठी नागपूरसह विदर्भात चित्रपटांच्या चित्रिकरणास सुरुवात करणे आवश्‍यक आहे. त्याची सुरुवात झाल्यास रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होईल. त्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे, असेही भारत गणेशपुरे म्हणाले. मुंबईला विदर्भाच्या लोकांचा टिकाव लागत नाही, असे म्हणणे म्हणजे आपला कमीपणा आपणच सिद्ध करणे होय. या राज्याचे मुख्यमंत्रीच विदर्भाचे आहेत. जात, उंची, वय, परिस्थिती प्रगतीच्या आड कधीच येत नाही. ज्या कामात आपली गती असेल व ज्या कार्याची आवड असेल त्या कामात लक्ष लावा. यश तुमच्यासोबत राहील. तुम्ही जो विचार मनात आणला त्या विचारांना व्यासपीठ देण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम आहे. लवकरच आपण जे निर्माण करू, त्याच्या प्रेमात पडू नका. ते विसरा व पुन्हा नवे काही निर्माण करण्याचा ध्यास घ्या, असा मौलिक सल्ला अभिनेते भारत गणेशपुरे यांनी दिला. अभिनेते संदीप कुलकर्णी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संचालन रेणुका देशकर यांनी केले. इनोव्हेशन पर्वचे मुख्य समन्वयक केतन मोहितकर यांनी आभार मानले.
स्टार्टअप फेस्टचे उद्‌घाटन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते श्री गणेशाची पूजा करून आणि दीपप्रज्वलन करून स्टार्ट अप फेस्टचे उद्‌घाटन करण्यात आले. "इनोव्हेशन पर्व'च्या निमित्ताने "देशी जुगाड-द इनोव्हेशन हाऊस' हा टीव्ही शो भविष्यात येणार आहे. त्याच्या पहिल्या पत्रकाचे अनावरणही नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

loading image
go to top