भाजपला मोठा धक्का; महाविकास आघाडीचा वाढला आणखी एक आमदार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकी रणसंग्रामात भाजपला महाविकास आघाडीने जोरदार धक्का दिला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांनी भाजपचे उमेदवार सुमीत बाजोरीया यांचा पराभव केला असल्याने महाविकास आघाडीचा आणखी एक आमदार वाढला आहे.

यवतमाळ : यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीत रणसंग्रामात भाजपला महाविकास आघाडीने जोरदार धक्का दिला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांनी भाजपचे उमेदवार सुमीत बाजोरीया यांचा पराभव केला असल्याने महाविकास आघाडीचा आणखी एक आमदार वाढला आहे. 

महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांना 298 मतं मिळाली आहेत. भाजपचे सुमित बाजोरिया यांना 185 मतं मिळाली असून 6 मतं बाद ठरल्याची माहिती आहे. यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी शुक्रवार (ता.31) जानेवारीला मतदान झालं होतं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे महाविकास आघाडीने बाजी मारली आहे.

यवतमाळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेतून शिवसेनेचे तानाजी सावंत विधानपरिषदेचे सदस्य होते. आता ते उस्मानाबादमधून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांच्या जागी माजी मंत्री सतीष चतुर्वेदी यांचे चिरंजीव दुष्यंत चतुर्वेदी यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. चतुर्वेदींनी अवघ्या सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता.

हे आहेत दुष्यंत चतुर्वेदी
दुष्यंत चतुर्वेदी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता
दुष्यंत चतुर्वेदी हे काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सतीष चतुर्वेदी यांचे चिरंजीव आहेत
सतीष चतुर्वेदी हे विदर्भाच्या राजकारणातील मोठं नाव आहे. ते 25 वर्ष आमदार आणि 10 वर्ष कॅबिनेट मंत्री होते. दुष्यंत चतुर्वेदी सध्या त्यांच्या शैक्षणिक संस्थांचं काम पाहण्यासोबतच सामाजिक कामांमध्येही व्यस्त असतात. वडील सतीष चतुर्वेदी यांच्याकडूनच त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. विदर्भात सतीष चतुर्वेदी यांचा मोठा जनसंपर्क आहे.

यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेतील पक्षीय बलाबल
भाजप - 147
शिवसेना - 97
काँग्रेस - 92
राष्ट्रवादी काँग्रेस- 51
प्रहार - 18
इतर - 72
बसपा - 4
एमआयएम - 8
एकूण - 489


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big shock to BJP; Another MLA who is maha vikas alliance