पाण्यासाठी झाले महायुद्ध! ...या गावात निघाल्या तलवारी, चाकू अन्‌ फरशा! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 एप्रिल 2020

चिलमछावणी येथील अरबाज अमिनोद्दीन पठाण यांच्या घरावर पाण्याची टाकी आहे. या टाकीतून चाऊस कुटुंबीय पाणी चोरत असल्याचा आरोप पठाण कुटुंबीयांनी केला. या कारणावरून शनिवारी, 18 एप्रिलच्या रात्री 9 वाजता दोन्ही कुटुंबात वाद उद्‌भवला. दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी परस्परांवर तलवार, चाकू व फरशीने हल्ला केला.

अमरावती : पाण्याच्या वादातून चिलमछावणी येथे शनिवारी, 18 एप्रिलच्या रात्री 9 वाजताच्या सुमारास दोन गटांमध्ये सशस्त्र चकमक उडाली. तलवार, चाकू व फरशीने परस्परांवर हल्ला केला. त्यात सहाजण जखमी झाले. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गाडगेनगर पोलिसांनी दोन्ही गटांतील 17 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून त्यापैकी सहा जणांना अटक केली आहे. 

अवश्य वाचा- साहेब, आमचंबी  लई नुकसान झालं, आम्हाले कवा मिळणार पीक विमा?

काशीब चाऊस आबिद चाऊस, मुदकसील हसन चाऊस, अहेमद बीन मोहम्मद चाऊस, आतीफ चाऊस ताकीद चाऊस, राजी चाऊस तालिब चाऊस व आसीम चाऊस हारदिल चाऊस (सर्व रा. चिलमछावणी ) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. चिलमछावणी येथील अरबाज अमिनोद्दीन पठाण यांच्या घरावर पाण्याची टाकी आहे. या टाकीतून चाऊस कुटुंबीय पाणी चोरत असल्याचा आरोप पठाण कुटुंबीयांनी केला. या कारणावरून शनिवारी, 18 एप्रिलच्या रात्री 9 वाजता दोन्ही कुटुंबात वाद उद्‌भवला. दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी परस्परांवर तलवार, चाकू व फरशीने हल्ला केला. या हल्ल्यामुळे परिसरात चांगलाच तणाव निर्माण झाला. परिणामी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. नागरिकांनी घटनेची माहिती गाडगेनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या प्रकरणी अरबाज पठाण यांच्या तक्रारीवरून दहा जणांविरुद्ध तर आतीफ चाऊस यांच्या तक्रारीवरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी पसार झालेल्यांचा शोध सुरू आहे. 

क्षुल्लक कारणावरून हा वाद झाला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्याने उद्‌भवलेला तणाव निवळला. शिवाय या प्रकरणात सहभागी लोकांविरुद्ध तातडीने कारवाई करून चौकशी सुरू केली. 
- मनीष ठाकरे, पोलिस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big War started for water! ...used swords, knives and tiles for that

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: