गडचिरोलीत अनेक पिढ्यांपासून सुरू आहे पेरणीआधी बिजा पंडूमची परंपरा

bija pandum
bija pandum

भामरागड(जि. गडचिरोली) : माणूस आशेवर जगतो. आणि जिथे निसर्गावर अवलंबून शेती सारखा व्यवसाय असेल, तिथे तर प्रचंड आशावादी असणे स्वाभाविकच आहे. निसर्ग अनुकुल राहावा, पीक चांगले यावे, यासाठी काही प्रथा आदिवासींकडून पाळल्या जातात. त्या प्रथा-परंपरांवर विसंबूनच हे शेतकरी येणाऱ्या पिकाकडे डोळे लाऊन बसलेले असतात. त्यातूनच काही प्रथा पिढ्यानुपिढ्या पाळल्या जातात.

उत्पन्न चांगले व्हावे, रोगराईपासून बचाव व्हावा या हेतूने गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम गावामध्ये पावसाच्या आगमनानंतर "बिजा पंडूम" पूजेला सुरूवात होते. (धानाचे बिज टाकणे यालाच माडीया भाषेत बिजा पंडूम असे म्हणतात.) यंदाही गावागावात या पूजेचा जल्लोष सर्वत्र दिसून येत असून पेरणीच्या कामाला वेग आला आहे.

आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम गावामध्ये आदिवासी समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. तिथे त्यांच्या पिढीजात परंपरा आजही जोपासल्या जात आहे. त्यामध्ये बिजा पंडूम पूजेला खूप महत्त्व आहे. या पूजेशिवाय एकही शेतकरी आपल्या शेतात बीज रोवत नाही किंवा पेरणी करीत नाही. याशिवाय पिकांच्या संदर्भात सात पकारचे पंडूम साजरे केले जातात. यात सर्व समाजातील शेतकरी सहभागी होतात.

पावसाळ्याला सुरूवात झाल्यानंतर पेरमा (पूजारी) यांच्या मार्गदर्शनाखाली गावकरी बिजा पंडूमच्या पूजेचे नियोजन करतात. यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी प्रत्येक शेतकऱ्यांकडून वर्गणी गोळा केली जाते. त्यानंतर गावालगतच्या जंगलात झाडाखाली बिजाईच्या पूजेचा कार्यक्रम चालतो. त्यानंतर सामुहिक भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता होते. विशेष म्हणजे या पूजेसाठी जमलेले विविध जाती-धर्माचे लोक गटागटाप्रमाणे आपले भोजन तयार करतात. मात्र,जेवणानंतर उरलेले अन्न घरी नेण्यावर बंदी असल्याने पूजेच्या परिसरातच त्याची विल्हेवाट लावली जाते.

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, एटापल्ली, भामरागड, कोरची, धानोरा, मुलचेरा या तालुक्‍यात बिजा पंडूम पूजेची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. याशिवाय बिजा सोवणी नंतर धानाच्या कापणीला सुद्धा पूजा करूनच सुरुवात केली जाते. या निमित्ताने ग्रामस्थ एकत्र येऊन पीक परिस्थिती, पाणी तसेच गावातील समस्येवर चर्चा करून त्यावर तोडगा काढतात. बिजा पंडूम पूजेच्या दिवशी झाड, फळ, सरपण गोळा करणे किवा शेती कामांना पूर्ण बंदी असते. मात्र, या नियमाचे उल्लंघन केल्यास दंडाची तरतूदही ग्रामस्थांनी केली आहे. सतत दोन दिवस आयोजित केल्या जाणाऱ्या बिजा पंडूम पूजेच्या पहिल्या दिवशी पुरुष तर दुसऱ्या दिवशी महिला सहभागी होत असतात.

आठवड्यातून एकदा "पोलो"
जिल्ह्यातील दुर्गम भागात मनोरंजनाच्या साधनांचा अभाव असल्याने आदिवासी गावामध्ये शेतीच्या हंगामात आठवड्यातून एकदा "पोलो" साजरा करतात. यादिवशी सर्व प्रकारची कामे बंद ठेवून ग्रामस्थ शेत शिवारात एकत्र येऊन पूजा, अर्चा तसेच सामुहिक भोजन करतात. यासाठी मुख्य रस्त्यावरून येजा करणाऱ्या वाहन चालकांकडून वर्गणी गोळा करतात महिला व पुरूष
वेगवेगळ्या ठिकाणी जमून ""पोलो "चा आनंद घेतात. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी भागामध्ये सुरू असलेल्या बिजा पंडूम व "पोलो "यातून आदिवासींच्या संस्कृती व परंपरेचेही जतन होत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com