प्रेयसी दुसऱ्यासोबत सेट झाल्याने टिकटॉकवर टाकले दर्दभरे व्हिडिओ अन्

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 April 2020

काही दिवसांनंतर प्रेयसीने त्याला दगा दिला आणि दुसऱ्या युवकासोबत सेट' झाली. त्यामुळे प्रेमभंग झालेल्या प्रियकराने टिकटॉकवर "दर्दभरे' व्हिडीओ बनवले. ते पोस्ट केल्यानंतर त्याच्यासह तीन चोरट्यांना पोलिस उपायुक्‍त चारमधील सायबर क्राईम टीमने अटक केली.

नागपूरः प्रेयसीवर खर्च करण्यासाठी एक युवक चक्‍क चोर बनला. त्याने वाहन चोरी करणे सुरू केले. मात्र, काही दिवसांनंतर प्रेयसीने त्याला दगा दिला आणि दुसऱ्या युवकासोबत सेट' झाली. त्यामुळे प्रेमभंग झालेल्या प्रियकराने टिकटॉकवर "दर्दभरे' व्हिडीओ बनवले. ते पोस्ट केल्यानंतर त्याच्यासह तीन चोरट्यांना पोलिस उपायुक्‍त चारमधील सायबर क्राईम टीमने अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 3 फेब्रूवारीला शोधन खडतकर (रा. सिद्धेश्‍वरनगर) यांची दुचाकी चोरी गेली. या प्रकरणी नंदनवन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान एक युवक दुचाकीच्या नंबर प्लेटवर "बुलाती हैं मगर...जाने का नहीं' असे लिहून टिकटॉकवर व्हिडीओ टाकत होता. ही बाब डीसीपी निर्मला देवी यांच्या कार्यालयातील सायबर क्राईमच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच पथक प्रमुख एपीआय जी.पी. राऊत, पीएसआय महेश कुरेवाड, कर्मचारी दीपक तऱ्हेकर, मिथून नाईक यांनी चोरट्यांचा हायटेक पद्धतीने शोध लावला.

अवश्य वाचा - खासदार; आमदारांचेच सँम्पल चुकत असतील तर सामान्यांचे काय? त्यांचा उद्विग्न सवाल

केवळ टिकटॉकच्या व्हिडीओवरून तीन चोरट्यांपर्यंत पोलिस पोहचले. आरोपीचे वय 17 वर्षे असल्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले तर त्याच्याकडून चोरीची बाईक विकत घेणारा सुबोध वाघमारे (पडोलेनगर) याला अटक करण्यात आली. प्रेयसीवर पैसे खर्च करण्यासाठी चोरी करीत होतो, तर सध्या ती दुसऱ्या युवकासोबत फिरत असल्यामुळे टिकटॉकवर चोरीच्या गाडीसह व्हिडिओ टाकत असल्याची कबुली आरोपीने दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bike Theft put behind the bar